खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदावर काेल्हापूरचे वर्चस्व

By संदीप शिंदे | Published: March 12, 2024 06:55 PM2024-03-12T18:55:24+5:302024-03-12T18:56:07+5:30

पुणे, सातारा संघास उपविजेतेपद : स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Kolhapur dominates overall title of Khashaba Jadhav Cup state level wrestling tournament | खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदावर काेल्हापूरचे वर्चस्व

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदावर काेल्हापूरचे वर्चस्व

उदगीर : येथील तालुका क्रीडा संकुलात शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने पार पडलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने ग्रीकोरोमन व महिला गटात विजेतेपद पटकाविले, तर फ्री स्टाइल प्रकारात कोल्हापूर शहर संघाने विजेतेपद पटकावीत वर्चस्व राखले आहे, तर पुणे व सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले.

बक्षीस वितरण सहसंचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते झाले, तर क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, दिनेश गुंड, शिवाजी कोळी, तहसीलदार राम बोरगावकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, मनोज पुदाले, भगवान पाटील तळेगावकर, रामचंद्र तिरुके, ॲड. गुलाब पटवारी, मन्मथप्पा किडे, सुधीर भोसले, ॲड. दत्ताजी पाटील, धनाजी मुळे, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अर्जुन आगलावे, संग्राम पाटील, दीपाली औटे, वर्षा मुस्कावाड, पोलिस निरीक्षक करण सोनकवडे, पो. नि. अरविंद पवार उपस्थित होते.

१७२ गुणांसह कोल्हापूरची विजेतेपदावर मोहोर...
ग्रीकोरोमन प्रकारात कोल्हापूर जिल्हा संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवीत १७२ गुणांसह विजेतेपदावर मोहोर उमटवली. पुणे जिल्हा संघाला ९० गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर सांगलीच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. फ्री-स्टाइल प्रकारात कोल्हापूर शहर संघाने सर्वाधिक १३५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. पुणे शहर संघाला १३० गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर जिल्हा संघ १२० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. महिला गटात अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा संघाने ११५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. सातारा संघाने १०५ गुणांसह दुसरा, तर सांगली संघाने १०५ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार व ३० हजार रुपयांच्या बक्षिसांनी गौरविण्यात आले.

सोनबाचा सोनेरी चौकार...
कोल्हापूरच्या सोनबा गोंगाने याने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा चौकार ठोकण्याचा पराक्रम केला. यंदाच्या ६५ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सोनबाने नाशिक जिल्ह्याच्या शुभम मोरेला १०-० गुण फरकाने लोळवून आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजवून दाखविले. शुभमला रौप्यपदक मिळाले. या गटात पुणे शहरचा अभिजित शेळके व कोल्हापूरचा प्रतीक साळोखे कांस्य पदकाचे मानकरी ठरले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. श्याम डावळे यांनी मानले.

Web Title: Kolhapur dominates overall title of Khashaba Jadhav Cup state level wrestling tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.