माटेफळच्या खोसे गुरुजींची शाळा देशपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST2021-09-05T04:24:39+5:302021-09-05T04:24:39+5:30

मुरुड : लातूर तालुक्यातील माटेफळ येथील रहिवासी असलेले उमेश खोसे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोदरा (ता. उमरगा) येथील जिल्हा परिषद ...

Khose Guruji's school of Matephal is at the national level | माटेफळच्या खोसे गुरुजींची शाळा देशपातळीवर

माटेफळच्या खोसे गुरुजींची शाळा देशपातळीवर

मुरुड : लातूर तालुक्यातील माटेफळ येथील रहिवासी असलेले उमेश खोसे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोदरा (ता. उमरगा) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून, ऑफलाईन ॲप बनवून त्यातून ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रपती पुरस्कारही जाहीर झाला आहे.

कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर येथे कार्यरत असलेले शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांच्या कर्तृत्वास राष्ट्रपती पुरस्काराची सुवर्णकिनार लाभल्याने त्यांनी आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. उमेश खोसे यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर साधी मोबाईलला रेंज नव्हती अशा तांड्यावर मुलांना ऑफलाईन शिकता यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे यासाठी ५१ ऑफलाईन ॲपची निर्मिती केली आहे. तसेच मुलांच्याच सहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या बंजारा बोली भाषेत पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. खोसे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहेत. त्यांची ५ पुस्तके व ४७ लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दिक्षा या केंद्र शासनाच्या ॲपवर ई-कंटेंट तयार केले आहेत. खोसे व त्यांचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी राबविलेल्या शिक्षण संस्कार शिबिर या नवोपक्रमास राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या लोकांनी दिलेले योगदान, तसेच ग्रामपंचायत व इतर संस्थेच्या माध्यमातून लोकवाट्यातून त्यांनी शाळा डिजिटल बनविल्या. टॅब स्कूल या उपक्रमातून मुले वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले आहेत.

ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण...

कोरोनाच्या काळात उमेश खोसे यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन ३६५ दिवस सुरू आहे. मुले दीक्षा ॲप तसेच इतर साधनाच्या सहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. अशा काळात त्यांनी शाळेची स्वतःची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी-बारावी प्रमाणे शाळेचा ऑनलाईन निकाल लावला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनास मदत होत आहे.

Web Title: Khose Guruji's school of Matephal is at the national level