प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केळगाव- खडक उमरगा ते बसपूर रस्त्याचे काम १० वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. मात्र कधी निधीचा अभाव तर कधी ठेकेदाराच्या वादामुळे हे काम प्रलंबित राहिले. जवळपास ८ किमी रस्त्याच्या कामासाठी सहा कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्याचे मजबूतीकरण, डांबरीकरण तसेच या मार्गावरील काही पुलाचे काम करण्याचे अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आले आहे. सदरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र केळगाव व खडक उमरगा या ठिकाणच्या पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. शिवाय, बसपूर येथून मांजरा नदी पात्रावरील पुलापर्यंत डांबरी काम अर्धवट आहे.
बसपूर व खडक उमरगा या गावी पूर्वी केलेले सिमेंट काँक्रिटचे काम नवीन ठेकेदाराने खराब झाले म्हणून काढून नवीन सिमेंट रस्ता केला. मात्र या रस्ता कामावर पाणी कमी वापरल्याने रस्ता उखडला आहे. परिणामी, पूर्वीचाच रस्ता बरा होता, असे नागरिक म्हणत आहेत. दरम्यान, याबाबत दोन्ही गावातील नागरिकांनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही.
काम पूर्ण झाल्याशिवाय बिल अदा करु नये...
या रस्त्यावरील काही पुलाची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. हे काम पूर्ण होण्याची मुदत ३० जून २०२१ आहे. संबंधित ठेकेदाराकडून काम करण्याचा वेग अतिशय संथ असल्यामुळे पूर्वी केलेले काम उखडून जात आहे. तसेच रस्त्यावरील खडी उखडल्याने व मुरूमाचा वापर करण्यात आल्याने वाहन धावले की, गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईटपट्ट्यासाठी वापरलेला मुरूम कमी प्रमाणात आहे. सिमेंट रस्ता व साईट पट्ट्याच्या कामाचे बिल ३१ मार्चपूर्वी काढण्याची घाई संबंधित ठेकेदार करीत असल्याचे दिसून येत आहे. सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी केळगाव, खडक उमरगा, बसपूर येथील नागरिकांनी केली आहे.