कमालवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST2021-01-02T04:16:57+5:302021-01-02T04:16:57+5:30
देवणी : तालुक्यातील कमालवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. कमालवाडी ग्रामपंचायत सात सदस्यांची असून, गावातील अकरा उमेदवारांनी ...

कमालवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
देवणी : तालुक्यातील कमालवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. कमालवाडी ग्रामपंचायत सात सदस्यांची असून, गावातील अकरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज छाननीनंतर मंजूरही झाले. त्यानंतर या निवडणुकीबाबत ग्रामस्थांनी एक व्यापक बैठक घेऊन गाव एकसंघ ठेवण्यासाठी, गावातील राजकीय कटुता टाळण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा संकल्प केला. त्यानुसार शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अकरा उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे सहा अर्ज शिल्लक राहिल्याने हे सहाही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर सातवी जागा ही अनुसूचित जमाती तथा एसटी या संवर्गासाठी राखीव असून, या जागेवर एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ती रिक्त राहणार आहे.
दरम्यान, बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये बालाजी प्रताप गणापुरे, भारतबाई सूर्यभान, वितपल सय्यद अहमद मोहम्मदसाब, लताबाई रामचंद्र येरमे, गणेश भीमराव हक्के आणि अनिता गोविंद कांदनगिरे यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल तहसीलदार सुरेश घोळवे यांनी ग्रामस्थांचे काैतुक केले आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. येडले, सहाय्यक बी. पी. गुडसूरकर यांनी पुढाकार घेतला.