गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, हे कसले ब्रेक द चेन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:17+5:302021-04-10T04:19:17+5:30
लातूर : गतवर्षभरात एक-दीड महिनाच व्यवसाय सुरू राहिला. कोरोनाच्या संसर्गामुळे दुकाने बंद ठेवली होती. तरीही साखळी तुटली नाही. आता ...

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, हे कसले ब्रेक द चेन?
लातूर : गतवर्षभरात एक-दीड महिनाच व्यवसाय सुरू राहिला. कोरोनाच्या संसर्गामुळे दुकाने बंद ठेवली होती. तरीही साखळी तुटली नाही. आता ‘ब्रेक द चेन’ या अभियानांतर्गत पुन्हा दुकाने बंद ठेवली आहेत. गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, हे कसले ब्रेक द चेन? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यापारी कुटुंबातील महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
लातूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे पुन्हा शासनाने जिल्ह्यातील व्यावसायिकांची दुकाने बंद केली आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी कुटुंबातील महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता लाॅकडाऊनच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त झाल्या. व्यवसाय बंद असल्याने घरप्रपंच भागवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घरभाडे, दुकानभाडे, वीज बिल, कर्जाचे हप्ते, मुलांची फीस, नोकरांचा पगार कसा करायचा, हा प्रश्न तर आहेच. परंतु, घरप्रपंच भागविणे मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे शासनाने कोणतेही व्यवसाय बंद न करता कोरोना रोखण्याची मोहीम राबवावी, असा सूर गृहिणींच्या बोलण्यातून निघाला.
दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?
आमचा झेराॅक्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आहे. व्यवसायासाठी आणि घरासाठी बँकेचे कर्जही काढलेले आहे. मात्र गेल्या वर्षभरात एक ते दीड महिनेच व्यवसाय सुरू राहिला. शाळा-महाविद्यालये नसल्यामुळे व्यवसायही झाला नाही. या कालावधीत आम्ही मुलांचा वाढदिवससुद्धा साजरा करू शकलो नाही.
- अनुराधा बोरा, गृहिणी
कोरोनाला रोखण्यासाठी लाॅकडाऊन हा पर्याय नाही. गेले वर्षभर दुकाने बंद ठेवली. तरी कोरोनाची चेन ब्रेक झाली नाही. आता पुन्हा ब्रेक द चेन अभियानानिमित्त दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. व्यावसायिकांवर ही वाईट वेळ आहे. मुलांचे शिक्षण करू शकत नाही की, घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करावा. - मेनका लेंढाणे, गृहिणी
शासनाने व्यापाऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे आणि पाहिजे तोपर्यंत लाॅकडाऊन ठेवावा. सध्या दुकाने बंद ठेवल्यामुळे व्यावसायिकांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झालेली आहे. लाईट बिल, नोकरांचा पगार, मुलांचे शिक्षण, घरप्रपंच भागवताना ओढाताण होत आहे. - मोना गांधी, गृहिणी
आमचा पान शाॅपचा व्यवसाय. त्यामुळे कुटुंब प्रपंचासाठी उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. कोरोना आल्यापासून हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. परिणामी, घरप्रपंच भागविण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नियमांचे पालन करून परवानगी द्यावी. - प्रणिता खेकडे, गृहिणी