पाटबंधारे उपविभागाने केली ६५ लाख थकीत पाणीपट्टी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:28+5:302021-04-07T04:20:28+5:30
शिरूर अनंतपाळ पाटबंधारे उपविभाग क्रमांक ६ अंतर्गत उदगीर, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यातील लहान मोठ्या १६ तलावाचा ...

पाटबंधारे उपविभागाने केली ६५ लाख थकीत पाणीपट्टी वसूल
शिरूर अनंतपाळ पाटबंधारे उपविभाग क्रमांक ६ अंतर्गत उदगीर, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यातील लहान मोठ्या १६ तलावाचा समावेश असून, यामध्ये तीन मध्यम प्रकल्प, चार लघु प्रकल्प, तर ९ साठवण तलावाचा समावेश आहे. मागील तीन-चार वर्षांत अवर्षण झाल्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात होती. परंतु यंदा सर्वच तलावात शंभर टक्के जलसाठा हाेता. परिणामी, यंदा येथील पाटबंधारे उपविभागास ६० लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर पाटबंधारे उपविभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने मोजक्या अधिकारी, कर्मचाऱ्याच्या मदतीने पाणीपट्टी वसुलीचे उदिष्ट गाठणे कठीण होते. अशा स्थितीत उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांनी कालमर्यादित नियोजन करून, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेत पाणीपट्टी भरण्यासाठी विनंती केली. उदिष्टापेक्षा अधिक वसुली झाली असून, ६० लाखाचे उदिष्ट असताना प्रत्यक्षात ६५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. वसुलीचे उदिष्ट ११० टक्के झाले आहे. यासाठी गोरख जाधव, प्रभाकर पाटील, गोविंद मोरे, चंद्रहास माने, बसवराज बिराजदार, कुमार पाटील यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
उपविभातंर्गत १६ तलावाचा समावेश...
शिरूर अनंतपाळ पाटबंधारे उपविभाग क्रमांक ६ अंतर्गत उदगीर, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्याचा समावेश असून, यामध्ये देवर्जन, साकोळ, घरणी हे तीन मध्यम प्रकल्प तसेच वागदरी, बोरोळ, गुरनाळ, वडमुरंबी, आनंदवाडी, लासोना, अनंतवाडी, कवठाळ, दरेवाडी हे ९ साठवण तलाव तर पांढरवाडी, आरसनाळ, भोपणी, दवणहिप्परगा हे चार लघू प्रकल्प अशा एकंदर १६ लहान मोठ्या तलावाचा समावेश आहे.
तीन कोटींची पाणीपट्टी थकीत...
शिरूर अनंतपाळ पाटबंधारे उपविभाग क्रमांक ६ अंतर्गत तलावाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मध्यम प्रकल्पासह सर्वच तलावावरून अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. परिणामी, पाणीपुरवठा योजनाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. वर्षानुवर्षे थकीत राहिल्याने एकंदर ३ कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी ६० लाख वसुलीचे उदिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ६५ लाखांची वसुली झाली आहे.