गुंतवणूकदारांची दहा काेटीला फसवणूक; मुंबईच्या विमानतळावरुन एकाला उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:42+5:302021-08-25T04:25:42+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातूर येथे फिनाॅमिनल हेल्थ केअर कंपनीच्या नावाखाली २०१६ मध्ये २२ जणांच्या संचालक मंडळाने लातूरसह परिसरातील २ ...

गुंतवणूकदारांची दहा काेटीला फसवणूक; मुंबईच्या विमानतळावरुन एकाला उचलले
पाेलिसांनी सांगितले, लातूर येथे फिनाॅमिनल हेल्थ केअर कंपनीच्या नावाखाली २०१६ मध्ये २२ जणांच्या संचालक मंडळाने लातूरसह परिसरातील २ हजार नागरिकांकडून रक्कम जमा केली. तुम्ही कंपनीचे शेअर खरेदी करा, तुम्हाला ९ वर्षांत दुप्पट रक्कम दिली जाईल. या कालावधीत सर्व आराेग्याच्या सुविधा, सवलती, मेडिकल क्लेम देण्याबाबत आमिष दाखविण्यात आले. याला बळी पडलेल्या जवळपास दाेन हजार नागरिकांनी तब्बल दहा काेटींची रक्कम कंपनीकडे भरली. मात्र, कंपनीकडून देण्यात आलेली हमी, आराेग्याच्या सुविधा, सवलती आणि दामदुप्पट रक्कम देण्याबाबत चालढकलपणा करण्यात आला. यावेळी गुंतवणूक करण्यात आलेल्या नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. याबाबत २०१८ मध्ये लातूर येथील शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात कंपनीचा चेअरमन नंदलाल ठाकूर यांच्यासह कंपनीच्या २२ संचालकांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, या गुन्ह्यातील रक्कम माेठी असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. आराेपीला अटक करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मागावर हाेते. ताे मुंबईत तळ ठाेकून असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून लातूर पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे लातूर पाेलिसांनी मुंबई विमानतळ येथे सापळा लावला. चेअरमन नंदलाल ठाकूर हा विमानतळावर आला असता, त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, दहा दिवसांची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली.
लूक आऊट नाेटीस जारी...
दाेन हजार नागरिकांना गंडा घालत दहा काेटींचा घाेटाळा केल्याप्रकरणी कंपनीचा चेअरमन नंदलाल ठाकूर याच्याविराेधात लातूर पाेलिसांनी लूक आऊट नाेटीस जारी केली हाेती. त्यास या नाेटिसीच्या आधारे मुंबई विमानतळ पाेलीस आणि लातूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आता त्यांच्या २२ संचालकांचा शाेध सुरू आहे.
नेपाळ, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळात गंडा...
अटकेत असलेल्या कंपनीचा चेअरमन आणि संचालकांनी नेपाळ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यातील हजाराे गुंतवणूकदारांना गंडविल्याची माहिती आता समाेर आली आहे. याबाबत त्या-त्या राज्यात स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. ठाकूर हा गेल्या अनेक दिवसांपासून पाेलिसांना चकवा देत फरार हाेता. ताे कधी नेपाळ, तर कधी मुंबईमध्ये दबा धरून बसला हाेता. आता त्याला लातूर पाेलिसांनी अटक केली आहे.