८०० हेक्टरवरील उसात हरभऱ्याचे आंतरपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:08+5:302021-02-05T06:23:08+5:30

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात नवीन उसाची लागवड करण्यात आली असून, पट्टा पध्दतीने लागवड केलेल्या उसाच्या सरीत ...

Intercropping of sugarcane on 800 hectares | ८०० हेक्टरवरील उसात हरभऱ्याचे आंतरपीक

८०० हेक्टरवरील उसात हरभऱ्याचे आंतरपीक

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात नवीन उसाची लागवड करण्यात आली असून, पट्टा पध्दतीने लागवड केलेल्या उसाच्या सरीत ८०० हेक्टरवर हरभऱ्याचे आंतरपीक घेण्यात आले आहे. त्यातून दुहेरी उत्पादनासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

तालुक्यातील घरणी, साकोळ, डोंगरगाव, पांढरवाडीसारखे मोठे प्रकल्प तीन वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे मोडीत निघालेल्या उसाची पुन्हा लागवड केली जात आहे. बहुतांश शेतकरी तुरीच्या राशी करून ऊसलागवड करीत आहेत. जागृती शुगर्सच्या वतीने कार्यकारी संचालक सुनील देशमुख यांनी शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना ऊस बेण्याचा मोफत पुरवठा व्हावा म्हणून ऊसविकास योजना सुरू केली आहे. त्याला शेतकरी चांगला प्रतिसाद देत तुरीच्या राशीनंतर उसाची लागवड करीत आहेत. त्यामुळे जवळपास ३ हजार हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

पहिल्या वर्षी नवीन ऊस लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. त्यातच पट्टा पध्दतीने म्हणजे, चार ते पाच फुटांच्या सरी वरंबा पध्दतीने ऊसलागवड झाल्याने उसाचे पीक मोठे होईपर्यंत त्यात हरभऱ्याचे आंतरपीक घेण्यासाठी सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ८०० हेक्टरवर हरभऱ्याचे आंतरपीक घेण्यात आले आहे. ऊस आणि हरभरा असे दुहेरी उत्पादन घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

कृषी विभागाकडून प्रोत्साहन...

उसाच्या लागवडीत हरभऱ्याचे आंतरपीक घेण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळावी म्हणून, तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर तळेगाव (दे.) ची निवड करून १० हेक्टर्सला मोफत बियाणे पुरवठा केला आहे. त्यामुळे तिथे हरभऱ्याचे आंतरपीक घेण्यात आल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब गाढवे, शिवप्रसाद वलांडे यांनी दिली. त्यामुळे आंतरपीक लागवडीस कृषी विभागाचे प्रोत्साहन मिळत आहे.

Web Title: Intercropping of sugarcane on 800 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.