जिल्हाभरात वाहनांची तपासणी; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:50+5:302021-04-10T04:19:50+5:30
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

जिल्हाभरात वाहनांची तपासणी; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलीस आणि महसूल विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला अंमलबजावणीच्या सूचना केल्या आहेत. यासाठी त्या-त्या स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस दलाची मदत घेतली जात आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एकूण २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जात आहे. लातूर शहरात पाच नंबर चौक, राजीव गांधी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बाभळगाव नाका, नवीन नांदेड नाका, स्वामी विवेकानंद चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, गंजगोलाई परिसर, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, पाण्याची टाकी, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका आणि औसा रोड परिसरात पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. शिवाय, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.