योग्यवेळी श्रवण तपासणीने दुष्परिणाम रोखता येतात : डॉ. तुषार वनसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 02:05 PM2019-03-08T14:05:36+5:302019-03-08T14:06:47+5:30

शालेय विद्यार्थ्यांना सर्दी, घश्याचे संसर्ग यामुळे बहिरेपणा येतो तर वृद्धांमध्ये वयोमानानुसार श्रवण क्षमतेचा ऱ्हास होतो. 

inspection can prevent Audible side effects: Dr. Tushar Vanasagar | योग्यवेळी श्रवण तपासणीने दुष्परिणाम रोखता येतात : डॉ. तुषार वनसागर 

योग्यवेळी श्रवण तपासणीने दुष्परिणाम रोखता येतात : डॉ. तुषार वनसागर 

Next

उदगीर (लातूर ) : बहिरेपणामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्यवेळी श्रवण क्षमता तपासणी करावी, असे मत श्रवणशास्त्रज्ञ, भाषा-वाचा विकारतज्ज्ञ डॉ. तुषार वनसागर यांनी मांडले. 

प्रत्येक बाळाची श्रवण क्षमता तपासणी करणे आवश्यक आहे. एक हजार बाळ जन्मदर गृहीत धरला तर त्यात ५ ते ६ बाळ जन्मत: बहिरे असतात, असा निष्कर्ष निघाला आहे. गर्भवती मातेच्या कुपोषणामुळे जन्मजात बहिरेपणा येतो. गर्भाची अपुरी वाढ, नात्यात विवाह होणे, आनुवंशिकता, जन्मानंतर होणारा कावीळ, डोक्यात ताप चढणे, बाळाचे जन्माच्या वेळी वजन कमी ही ज्ञात कारणे आहेत. शालेय विद्यार्थ्यांना सर्दी, घश्याचे संसर्ग यामुळे बहिरेपणा येतो तर वृद्धांमध्ये वयोमानानुसार श्रवण क्षमतेचा ऱ्हास होतो. 

डॉ. वनसागर म्हणाले, तपासणीनंतर श्रवण ऱ्हास तीन प्रकारात वर्गीकृत केला जातो. कानाचा पडदा किंवा हाडाच्या साखळीला इजा असणे, कानाच्या नसची क्षमता कमी झाल्यामुळे, आवाज वाहून नेण्याची क्षमता मंदावणे किंवा वरील दोन प्रकार एकत्र होऊन होतो. पडद्याला इजा किंवा हाडाच्या साखळीला इजा झाली तर वैद्यकीय उपचार वा शस्त्रक्रिया करता येते. कानाची नस क्षमता कमी असेल तर बहिरेपणाच्या तीव्रतेनुसार श्रवण यंत्र बसविता येते. विविध तांत्रिक यंत्राद्वारे कानाची श्रवण क्षमता तपासणी करता येते. जे बाळ ऐकू शकते तेच बोलू शकतात. जन्मत: बहिरे असलेल्या बाळाच्या श्रवण क्षमतेनुसार दोन्ही कानांना श्रवणयंत्र बसविले जाते. त्यानंतर त्याला वाचा-भाषा उपचार दिले जातात. आवाज ऐकणे आणि बोलणे याचे प्रशिक्षण दिले जाते. सुधारणा न दिसल्यास नुकतंच विकसित झालेले प्रगत तंत्रज्ञान कॉक्लिर इंप्लान्ट करण्याचा सल्ला दिला जातो. जन्म झालेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत ऐकण्यात कमीपणा जाणवला तर योग्य वेळी श्रवण तपासणी करून केलेला उपचार महत्त्वाचा ठरतो.

श्रवण क्षमता तपासणी...
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने ३ मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून घोषित केला आहे. जगात कोट्यवधी लोक कर्णबधिर आहेत. अविकसित आणि विकसनशील देशात कर्णबधिरपणा तपासणी आणि तंत्रज्ञान याबाबत सामान्यजन अनभिज्ञ आहेत. यासंदर्भात जनजागरण होण्यासाठी यंदा जागतिक आरोग्य संघटनेने ‘श्रवण क्षमता तपासणी’ हे ध्येय घेऊन प्रचार-प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: inspection can prevent Audible side effects: Dr. Tushar Vanasagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.