चौकशीचा अहवाल चुकीचा, ग्रामस्थांची प्रशासनावर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:19+5:302021-03-17T04:20:19+5:30
ग्रामस्वच्छता अभियानात नागरिकांसाठी प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे शौचालयासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला हाेता. मात्र सरपंच आणि ग्रामसेवकांच्या ...

चौकशीचा अहवाल चुकीचा, ग्रामस्थांची प्रशासनावर नाराजी
ग्रामस्वच्छता अभियानात नागरिकांसाठी प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे शौचालयासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला हाेता. मात्र सरपंच आणि ग्रामसेवकांच्या संगणमताने खात्यावरील १०० शौचालयाचे १२ लाख ९६ हजार रुपये परस्पर उचलून गैरव्यवहार केल्याचे समाेर आले. याबाबत ८ ते १२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराराविरोधात उपोषण केले. सदर प्रकरण अंगलट येत असल्याचे समाेर आल्याने, या रकमेपैकी १० लाख ४७ हजार रुपये सदर दाेघांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर भरणा केला आहे. याप्रकरणी तहसीलदार गणेश जाधव यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे चौकशी समिती नेमण्यात आली हाेती. १५ मार्चरोजी चौकशी अधिकारी संजय आडे यांनी चौकशी अहवाल सादर केला. मात्र सदर चौकशी समाधानकारक नसून, केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप संबंधित तक्रारदारांनी केला आहे. याप्रकरणाची नि:पक्षपातीपणे स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करावी. तटस्थपणे चाैकशी करुन ग्रामस्थांना न्याय द्यावा. त्याचबराेबर ग्रामसेवक, संबंधित अभियंता आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही रामलिंग मुदगड येथील ग्रामस्थांनी केली आहे.
दोषीवर कारवाई करणार...
याबाबत गटविकास अधिकारी अमोल ताकभाते म्हणाले, हे सर्व प्रकरणे २०१६-१८ या काळातील असून, आता निलंगा तालुक्यातील नवीन ग्रामपंचायतीचे शौचालयाचे काम स्थळपाहणी केल्यानंतरच बिले अदा केली जातील. रामलिंग मुदगड प्रकरणातील दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी माजी सभापती अजित माने म्हणाले, शौचालयाचे पैसे उचलून पुन्हा चौकशी झाली म्हणून हे प्रकरण अंगलट येत आहे. असे दिसताच खात्यावर भरणे म्हणजे हा गुन्हा सिद्ध झाल्याचाच प्रकार आहे. परिणामी, या प्रकरणातील संबंधितांची सखोल चौकशी करावी, त्या काळातील तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतीत असे प्रकार घडले असावेत, त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा एल.ए.क्यू. करणार असेही माने म्हणाले.