कोचिंग क्लासेसच्या व्यवस्थापनात पुढाकार (सखी ॲचिव्हर्ससाठी लेख)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST2021-02-05T06:26:29+5:302021-02-05T06:26:29+5:30
वृषाली जोशी यांचे पती सुधाकर बळवंतराव जोशी हे लातूर शहरातील कोचिंग क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व. पूर्वाश्रमीच्या वृषाली जोशी यांचे शालेय ...

कोचिंग क्लासेसच्या व्यवस्थापनात पुढाकार (सखी ॲचिव्हर्ससाठी लेख)
वृषाली जोशी यांचे पती सुधाकर बळवंतराव जोशी हे लातूर शहरातील कोचिंग क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व. पूर्वाश्रमीच्या वृषाली जोशी यांचे शालेय शिक्षण बीडमध्ये चंपावती विद्यालयात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयातून त्यांनी पूर्ण केले. लग्नानंतर सुधाकर जोशी यांच्यासमवेत कोचिंग क्लासमध्ये वृषाली यांनीही कार्यभार स्वीकारला. घरातील सगळी कामे संपवून सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत क्लासेसच्या व्यवस्थापनामध्ये लक्ष दिले. कर्मचाऱ्यांच्या बैठका घेणे, स्वच्छतेच्या कामाचे नियोजन करणे, त्यांच्या बैठका घेणे ही कामे नित्याने केली. हे करीत असताना निश्चितच ताणतणावाला सामोरे जावे लागले. शेवटी जोशी दाम्पत्याने कोचिंग क्लासच्या जवळच एक स्वतंत्र फ्लॅट घेऊन आपल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुलांचे संगोपन, कुटुंबाची जबाबदारी, क्लासेसचे व्यवस्थापन या सर्व आघाड्यांवर लढा देत स्वावलंबी होण्याचा मार्ग वृषाली जोशी यांनी स्वीकारला. त्यासाठी आई-वडील, भाऊ-बहीण, मावशी आणि अवतीभोवतीच्या लोकांचा आधार वृषाली यांना मिळाला.
व्यवसायात अनेक अडचणी जाणवल्या. त्यावर तत्पर निर्णय घेण्याची क्षमता सुधाकर जोशी आणि वृषाली जोशी यांच्याकडे होती. उत्पन्नाबरोबरच बचतीकडे लक्ष देत यश मिळविता येते, यावर वृषाली यांचा दृढविश्वास आहे. त्यांच्यासाठी पती सुधाकर जोशी हे आदर्श राहिले आहेत. घर आणि व्यवसाय सांभाळताना पती सुधाकर यांनी खंबीर पाठिंबा दिला आहे. काम करताना काही कमी-जास्त झाले तर, त्याचा दोष वृषाली यांना दिला नाही. पती सुधाकर जोशी यांच्याबरोबर मुलगा वरद आणि विराज यांचीही साथ मिळाली आहे. महिलांनी स्वत:च्या आवडीनुसार क्षेत्र निवडून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे. उत्तम शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटला पाहिजे, असे करिअर घडविले पाहिजे, असा विचारही वृषाली यांनी मांडला आहे.
- वृषाली सुधाकर जोशी