महागाईने तेल ओतले, घरातील बजेट बिघडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST2021-09-09T04:24:53+5:302021-09-09T04:24:53+5:30
स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. तुलनेत मासिक बजेट वाढले नसल्याने सर्वच घटकातील नागरिकांना किचन बजेट सांभाळताना ...

महागाईने तेल ओतले, घरातील बजेट बिघडले !
स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. तुलनेत मासिक बजेट वाढले नसल्याने सर्वच घटकातील नागरिकांना किचन बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे. खाद्यतेल, साखर, हरभरा, तूर, मूग डाळीचे दर अजूनही वाढतच आहे. मागील दहा दिवसांत साखरेच्या दरात प्रतिक्विंटल जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली. भाजीपाल्यांच्या दरातही सातत्याने चढ-उतार होत आहेत.
तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबांचा वाढलेला महिन्याचा खर्च
खाद्यतेल ३००
धान्य ४००
शेंगदाणे १००
साखर २५
साबुदाणा ४०
डाळ ३०
सिलिंडर गॅस १९१
पेट्रोल १५
डिझेल १३
एकूण १११४
कमी तेलाची फोडणी
गेल्या वर्षापासून खाद्यतेलाच्या किमतीत वाढत आहेत. सर्वच तेलाचे दर दुपटीने वाढले असल्याने गृहिणींनी भाजी बनविताना खाद्यतेलाचा कमी वापर करीत आहेत.
सिलिंडर हजाराच्या घरात
मागील दीड-दोन वर्षांपूर्वी सिलिंडरचे दर ६०० रुपयांच्या जवळपास होते. तसेच त्यावर सबसिडीही १०० ते १५० रुपये मिळत. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांनाही सिलिंडर परवडत होता. मागील काही महिन्यांपासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक महिलांनी चुलीवर स्वयंपाक करण्यास पसंती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सिलिंडरचे दर ९०१ रुपये झाले.
गृहिणी म्हणतात...
कोरोना काळात हाताला काम नसल्याने आर्थिक संकटे उभे राहत आहेत. त्यातच सातत्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवावे. - सुनंदा माने, गृहिणी
पेट्रोल, डिझेलच्या दराबरोबरच गॅस सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. डाळी तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडत आहे.- पंचशील डावकर, गृहिणी