लातूर : औसा येथील श्रीनिवास निवासी मतिमंद विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनासाठी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. बुधवारी या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, अचानक मंडप कोसळून चार उपोषणकर्ते जखमी झाले आहेत.
औसा येथील श्रीनिवास निवासी मतिमंद विद्यालयातील कर्मचारी गेल्या १३ महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. आपले प्रलंबित वेतन द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात व्ही. जी. राठोड, व्ही. एम. बिरंजे, व्ही. जे. तोटरे, ए. व्ही. जोशी, यु. एन. डाबळे, के. आर. हांडे, के. एन. स्वामी, के. डी. जोगी, व्ही. वाय. वाडीकर, आर. एम. विभुते, एच. व्ही. माने, के. व्ही. लासुरे हे सहभागी झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उपोषण ठिकाणचा मंडप अचानक कोसळला. यात चौघे जखमी झाले असून, त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्रुटींची पूर्तता केली नाही...
या शाळेसंदर्भात ऑक्टोबर २०२०मध्ये शासन स्तरावर सुनावणी होऊन त्रुटींची पूर्तता करण्यास संधी देण्यात आली होती. या त्रुटी पूर्ण करुन दिव्यांग कल्याण आयुक्तांची मान्यता घेणे आवश्यक आहे. या मान्यतेशिवाय थकीत वेतन काढता येत नाही. मानवी दृष्टीकोन समोर ठेवून तीन महिन्यांचे वेतन काढण्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले असून, आयुक्तांच्या आदेशानंतर थकीत वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी सांगितले.