औराद शहाजानी परिसरात परतीच्या पावसाने सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:06+5:302021-04-07T04:20:06+5:30

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, या पावसाने या परिसरातील तेरणा आणि मांजरा नदी ...

Increased irrigation due to return rains in Aurad Shahjani area | औराद शहाजानी परिसरात परतीच्या पावसाने सिंचनात वाढ

औराद शहाजानी परिसरात परतीच्या पावसाने सिंचनात वाढ

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, या पावसाने या परिसरातील तेरणा आणि मांजरा नदी पूर्ण क्षमतेने दुथडी भरून वाहिल्या. या नद्यावरील औराद, तगरखेडा, सोनखेड, मदनसुरी, लिंबाळा, वांजरखेडा, किल्लारीसह सर्व उच्चस्तरीय आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. याशिवाय, या परिसरातील लघु साठवण तलाव, विहीर, विंधन विहीरींना चांगला पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध झाला. यातून यंदा तेरणा नदीवरील बंधाऱ्यात असलेल्या पाण्याचा वापर शेतीच्या सिंचन वाढीसाठी महत्वाचा ठरला आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, ऊस, भाजीपाला, फळबागा या क्षेत्राचे लागवड क्षेत्र वाढले. उत्पादनाची वाढ झाली आहे. बारमाही पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून, ऊस पिकाची लागवड यावर्षी वाढली आहे. याशिवाय भाजीपाला क्षेत्रात आणि फळबाग क्षेत्रात लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढले आहेत. तर कोरडवाहू घेणारा शेतकरी या पाण्याचा लाभ काही शेतीला झाल्याने रब्बी उत्पादन वाढीस फायदा झाला आहे. परिसरात भाजीपाला क्षेत्रात टोमॅटो, वांगी, शिमला, मिरची, साधी मिरची, फूलकाेबी, दोडका आदी भाजीपाला लागवड क्षेत्र वाढले आहे. याशिवाय, सिताफळ खरबूज, टरबूज, पपई याची लागवडही वाढली आहे.

नदीकाठावरील शेतीला झाला फायदा...

औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा नदीकाठावरील १ हजार २७५ हेक्टर क्षेत्र यंदाच्या हंगामात सिंचनाखाली आले आहे. तर विहीर, विंधन विहीर, तळे आणि तलाव या भागातील शेतीलाही पाणी साठा झाल्याने जवळपास ६०० हेक्टर सिंचनाचा हंगामी लाभ घेतला आहे. तेरणा नदीवरील पाटबंधारे बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा यंदा झाल्याने जवळपास बाराशे ७५ हेक्टर शेती सिंचनाचा लाभ झाल्याचे जलसिंचन शाखाधिकारी एस.आर. मुळे म्हणाले,

रब्बी उत्पादन वाढले असल्याचे मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील म्हणाले. यंदा परतीचा चांगला पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रातील ज्वारी गहू, हरभरा, ऊसासह भाजीपाला, फळबागा यांचे उत्पादन वाढले आहे.

बाजारात भाव नसल्याने नुकसान...

भाजीपाला उत्पादन वाढले पण कोरोनाच्या महामारीने बाजारपेठ बंद राहिल्या आहेत. बाजारात ग्राहक नसल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहे. परिणामी, उत्पादन वाढले असले तरी शेतीमाल मात्र शेतीच्या बांधावरच पडून आहे. असे शेतकरी विठ्ठल अंचुळे म्हणाले. शेवटच्या टप्प्यात आती पाऊस झाल्याने

हाताशी आलेले तुरीच्या पिकाचेही नुकसान झाले. हे रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. झालेली नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेकडाे शेतकरी सध्याला आर्थिक संकटात सापडले आहेत.

Web Title: Increased irrigation due to return rains in Aurad Shahjani area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.