लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, वातावरणात बदल झाल्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. सध्या सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले असल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली आहे.
सध्या वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी १५० ते २०० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे व्हायरल फिव्हरसह सर्दी, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. बालके आणि ज्येष्ठ नागरिक या आजाराने त्रस्त झाले आहेत.
ढगाळ वातावरणामुळे बहुतांश रुग्णांमध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, खोकला अशी लक्षणे आढळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी आहारविषयक खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे. शुद्ध पाणी, ताजा आहार आणि स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. सौम्य सर्दीची लक्षणे जाणवत असल्यास कोमट पाणी प्यावे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हळद टाकून दूध घ्यावे तसेच गरम वाफ घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
बहुतांश बालकांत सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आहेत. यात १५ वर्षांच्या आतील मुलांची संख्या अधिक आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना अंगदुखीचा त्रास होत आहे. सध्या या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले.
तत्काळ उपचार घ्यावेत...
थंडगार पाणी व उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. पाणी उकळून थंड करून प्यावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. डासोत्त्पत्ती वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याची भांडी झाकून ठेवावी. फ्रीजमागील पाणी काढावे. कुठलीही लक्षणे दिसून येताच तत्काळ उपचार घ्यावेत. पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.
- डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.