लोकमत न्यूज नेटवर्क
जळकोट : डोंगरी, दुर्गम तसेच लातूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जळकोट तालुक्यातील प्रवाशांना इच्छित ठिकाणी ये-जा करण्यासाठी पायपीट करण्यावाचून पर्याय नाही. गेल्या २२ वर्षांपासून येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस आगार मंजूर करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांची फरपट कायम असून, प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी बस आगाराची मागणी होत आहे.
जळकोट तालुक्याची १९९९मध्ये निर्मिती करण्यात आली आहे. मात्र केवळ तालुका करण्यापलिकडे पुढे कुठलीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. कित्येक दिवसांचा बस आगार निर्मितीचा प्रश्नही अडगळीत पडला आहे.
येथे बस आगार नसल्याने तालुक्यातील अनेक गावांमधील जनतेला स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतही राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीचे दर्शन झालेले नाही. त्यात बसून प्रवास करणे तर लांबची गोष्ट. तालुक्यातील प्रवाशांची संख्या तसेच बससेवेचा अभाव लक्षात घेता या तालुक्यासाठी स्वतंत्र बस आगाराची आवश्यकता आहे. याबाबत जनतेकडून सातत्याने मागणी केली जात आहे.
विविध निवडणुकांमध्ये हा मुद्दा चर्चिला जाऊन बस आगार चार-दोन महिन्यांत मंजूर करु, अशी आश्वासने नेतेमंडळी व राज्यकर्ते देतात. मात्र, पुढे याचा चक्क त्यांना विसर पडतो. काही वर्षांपूवी येथे बस आगार स्थापन करण्यासाठी तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय येथे परिवहन मंत्री, विभागाचे सचिव तसेच सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती.
त्यामुळे जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर काहीच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे तातडीने जळकोट येथे बस आगार मंजूर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा तालुक्यातील त्रस्त प्रवाशांनी दिला आहे.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय...
जळकोट तालुक्यात बस आगार नसल्याने कोणती बस कधी येणार, याची कल्पना नसते. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणावरुन जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यंदा तरी जळकोटला स्वतंत्र बस आगार मिळेल, अशी आशा तालुक्यातील प्रवाशांना आहे.