कोरोनाच्या धास्तीने नागरिक शेतात, वीजपुरठा खंडितमुळे गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:39+5:302021-04-20T04:20:39+5:30
रेणापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या एक हजाराच्या जवळपास कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या ...

कोरोनाच्या धास्तीने नागरिक शेतात, वीजपुरठा खंडितमुळे गैरसोय
रेणापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या एक हजाराच्या जवळपास कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही जणांनी गाव सोडून आपल्या शेतातील जागलीवर जाऊन राहत आहे. तालुक्यातील ब्रह्मवाडी, गव्हाण, दर्जी बोरगाव या भागातील नागरिकांचे शेतामध्ये जाऊन राहण्याचे प्रमाण जास्त आहे.
शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातच रहावे लागत आहे. त्यामुळे अंधारात रात्र काढावी लागत आहे. शेतात थ्री फेज वीजपुरवठा असतो. परंतु, भारनियमनामुळे व रात्री-अपरात्री सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ब्रह्मवाडी येथील शेतकरी व नागरिकांनी महावितरणचे उपविभागीय कार्यकारी अभियंता व या भागातील शाखा अभियंत्यास २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवावे, अशी मागणी केली. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांच्या मागणीला कसलाही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
२४ तास वीजपुरवठा ठेवावा...
कोरोनाच्या भीतीने या भागातील नागरिक शेतात जाऊन राहत आहेत. मात्र, वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यासाठी चार दिवसांपूर्वी महावितरणचे अभियंता यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे ब्रह्मवाडीचे शेतकरी भागवत माने यांनी सांगितले.