येरोळ : कोणत्याही पिकाचे योग्य नियोजन करून वेळीच देखभाल केल्यास भरघोस उत्पादन निघते. येरोळ येथील प्रगतशील शेतकरी वाघंभर गोविंदराव चौसष्टे यांच्या कुटुंबात तिखट मिरचीने गोडवा निर्माण केला आहे. केवळ २० गुंठे क्षेत्रावर त्यांना सुमारे लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
येथील वाघंभर चौसष्टे हे आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये विविध पिकांचे उत्पादन घेतात. बाजारात जे विकेल तेच पिकवा, या तंत्राचा अवलंब करून त्यांनी आपल्या २० गुंठे जमिनीमध्ये लागवड केलेल्या मिरचीच्या पहिल्याच तोडणीमध्ये त्यांना २५ हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले. येरोळ व परिसरातील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीऐवजी कमी दिवसात कमी खर्चात येणाऱ्या भाजीपाला लागवडीकडे जास्त असतो. गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाला नसल्यामुळे ते फेकून द्यावे लागले. परिणामी टोमॅटोसाठी लागवड केलेला खर्चही शेतकऱ्याच्या पदरी पडला नाही. शेतकरी चौसष्टे यांनी सुपर महाज्वाला या मिरचीची रोपे आणली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सऱ्या पाडून रोपांची त्यांनी शेतीत लागवड केली. प्रारंभी नांगरटी करून दहा बैलगाड्या शेणखत टाकून जमीन भुसभुशीत केली. सरी पाडण्यासाठी दोन हजार रुपये खर्च आला, तर मल्चिंग पेपरसाठी दोन हजार पाचशे रुपयांचा खर्च लागला. उन्हाळ्यामध्ये शेतातील बोअर आणि विहिरीच्या माध्यमातून ठिंबक सिंचनाद्वारे थेंब थेंब पाणी देऊन मिरचीचा फड जगविण्याचा प्रयत्न केला.
पारंपरिक पिकाला फाटा देऊन आपल्या शेतीत मिरचीचे हे नवीन प्रयोग सुरू केले आहेत. मिरचीची तोडणी केल्यानंतर ती परिसरातील उदगीर, नळेगाव, साकोळ, वंलाडी व शिरूरअनंतपाळ येथील आठवडी बाजारामध्ये नेऊन ते स्वत: विक्री करतात.
४० रुपये किलोने विक्री...
येरोळ येथील प्रयोगशील शेतकरी वाघंभर मारोती चौसष्टे यांच्या कुटुंबाला शेतीची उत्तम जाण आहे. कुटुंबाच्या पाठबळामुळेच शेतीमध्ये विविध फळभाज्यांसह इतर पिके घेण्यासाठी सहकार्य मिळत आहे. मिरचीचा पहिला तोडा घेतला असून जवळपास ४० रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली आहे, त्यातून २५ हजार मिळाले असून आणखी सहावेळा तोडणी होणार आहे. त्यात १ लाखांहून अधिकचे उत्पादन होईल, असा दावा चौसष्टे यांनी केला. येरोळ येथील कृषी सहायक एम. ओ. मोदी यांनी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.