उदगीरात अनधिकृत पोस्टर, बॅनरवर मोठी कारवाई, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By संदीप शिंदे | Updated: January 25, 2024 19:13 IST2024-01-25T19:12:51+5:302024-01-25T19:13:31+5:30
मागील काही दिवसांपासून उदगीर शहरांमध्ये विविध ठिकाणी बॅनर व फ्लेक्स लावण्याची स्पर्धा सुरू झाली.

उदगीरात अनधिकृत पोस्टर, बॅनरवर मोठी कारवाई, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
उदगीर : शहरात मागील काही दिवसांपासून अनधिकृत बॅनर व पोस्टर लावण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी नगरपालिकेला याबाबत पत्र पाठविले. त्यानुसार नगरपालिका प्रशासनाने खडबडून जागे होत अवैधरीत्या विनापरवाना, बॅनर व फ्लेक्स काढण्याची मोहीम सुरू केली आहे.
उदगीर शहर हे अतिसंवेदनशील म्हणून पोलिस प्रशासनाकडे नोंद आहे. त्यामुळे याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन नेहमी सतर्क राहते. मागील काही दिवसांपासून उदगीर शहरांमध्ये विविध ठिकाणी बॅनर व फ्लेक्स लावण्याची स्पर्धा सुरू झाली. उदगीर शहरांमधून गेलेल्या मुख्य रस्त्यावरून हे बॅनर मोठ्या प्रमाणात उभे केले जात आहेत.
ही बाब स्थानिक पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन शहरातील अधिकृत व अनधिकृत लावण्यात आलेले पोस्टर काढून घेण्याबाबत पत्र दिले. त्यानुसार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील बॅनर त्वरित काढण्याची मोहीम सुरू केली. मागील दोन दिवसांपासून या मोहिमेस गती देण्यात आली आहे. परिणामी, शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.