लातुरात चाेर समजून काेल्हापूरच्या दाेघांना जमावाने केली बेदम मारहाण

By राजकुमार जोंधळे | Published: April 23, 2024 09:42 PM2024-04-23T21:42:12+5:302024-04-23T21:42:25+5:30

लातूर शहरातील बार्शी राेडवरील घटना...

In Latur, the mob brutally thrashed two people of Kolhapur, mistaking them for thief | लातुरात चाेर समजून काेल्हापूरच्या दाेघांना जमावाने केली बेदम मारहाण

लातुरात चाेर समजून काेल्हापूरच्या दाेघांना जमावाने केली बेदम मारहाण

राजकुमार जाेंधळे / लातूर : सध्याला शहारात चाेर आल्याच्या अफवांचे पीक जाेमात असून, बार्शी राेडवर काेल्हापूर येथील दाेघांना चाेर समजून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

पाेलिसांनी सांगितले, काेल्हापूर येथील गांधीनगर पाेलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली असून, पत्नी लातुरात असल्याची माहिती मिळाल्याने मुलगा आणि चुलता काेल्हापूर येथून मंगळवारी सकाळी लातुरात दाखल झाले. बार्शी राेडवर पत्र्याच्या कारखाना परिसरात हे दाेघे फिरत हाेते. काही नागरिकांना हे दाेघे चाेर असल्याचा संशय आला. त्या दाेघांना पकडून चाैकशी केली असता, ते काेल्हापूर येथील रहिवासी असल्याचे समाेर आले. परिणामी, जमावातील काहींनी हे चाेरच आहेत, असा समज झाला. त्यांनी दाेघांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा...हा...म्हणता बघ्यांची गर्दीही माेठ्या प्रमाणावर जमली. आम्ही चाेर नाहीत, आम्ही आमच्या हरवलेल्या महिलेच्या शाेधासाठी लातुरात आलाे आहाेत, असे सांगत विनवणी केली. मात्र, संतप्त जमाव काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. या घटनेची माहिती एमआयडीसी पाेलिसांना मिळाली. घटनास्थळी पाेलिस उपनिरीक्षक संदीप कराड, भागवत मुळे, माधव आंबेकर, ईश्वर व्यवहारे यांच्यासह इतर कर्मचारी दाखल झाले. जमावाच्या तावडीतून त्या दाेघा चुलत्या-पुतण्याला ताब्यात घेत चाैकशी केली असता, ते काेल्हापूरचे रहिवासी असल्याचे समाेर आले.

अफवांमुळे दाेघांना जमावाची मारहाण...

लातुरात सध्याला चाेर आल्याची अफवा माेठ्या प्रमाणावर पसरवली जात आहे. याबाबत स्थानिक पाेलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. मात्र, या अफवांमुळे नगारिकांत भीतीचे वातावरण असून, याच अफवांतून मंगळवारी काेल्हापूर येथून महिलेच्या शाेधात आलेल्या चुलत्या-पुतण्याला जमावाने बेदम मारहाण केली, असे पाेलिसांनी सांगितले.

काेल्हापूर शहरात मिसिंगची आहे नाेंद...

काेल्हापूर शहरातील गांधीनगर पाेलिस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार नाेंदविण्यात आली आहे. हरवलेली महिला लातुरात असल्याची माहिती तिच्या पतीला, चुलत सासऱ्याला मिळाली. या माहितीनंतर ते काेल्हापूर येथून मंगळवारी सकाळी लातुरातील बार्शी राेडवर दाखल झाले. ते महिलेचा शाेध घेत फिरताना जमावाने त्यांना संशयातून पकडले आणि चाेर असल्याचे समजून बेदम मारहाण केली.

Web Title: In Latur, the mob brutally thrashed two people of Kolhapur, mistaking them for thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.