भर उन्हाळ्यात अहमदपुरात २५ दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:44+5:302021-04-30T04:24:44+5:30
अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पात मुबलक जलसाठा असूनही पालिकेच्या नियोजनाअभावी नळाला २५ ते ३० दिवसाआड पाणी येत ...

भर उन्हाळ्यात अहमदपुरात २५ दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा!
अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पात मुबलक जलसाठा असूनही पालिकेच्या नियोजनाअभावी नळाला २५ ते ३० दिवसाआड पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईस सामाेरे जावे लागत आहे. होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध नसल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
अहमदपूर पालिकेच्या वतीने शहरास जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा होतो. जवळपास २० वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून हे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. परंतु, त्याची देखभाल घेतली जात नसल्याचे दिसत आहे. सध्या शहरातील नळास २५ ते ३० दिवसांतून एकदा पाणी येत आहे. त्यातही शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. जलशुद्धिकरण केंद्रातून ढोर गल्ली, खाटीक गल्ली, महादेव गल्ली, मारवाडी गल्ली, बागवान गल्ली, पंचशील नगर, हमणे गल्ली, दर्गापुरा, गढी गल्ली, पाटील गल्ली, देशमुख वाडा, फुलेनगर, लाईन गल्ली, बँक कॉलनी, नागोबा नगर, सत्तार कॉलनी, गायकवाड कॉलनी, साईनगर, श्रीनगर व परिसरास पाणीपुरवठा होतो. या केंद्राच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.
तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरमध्ये २५ दिवसांपासून कोलोरिफाय बंद असल्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यावरच शहरवासीयांना तहान भागवावी लागत आहे. परिणामी, विविध आजारांची भीती व्यक्त होत आहे.
टँकर येताच पाण्यासाठी झुंबड...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केेले आहे. परंतु, येथे पाणीटंचाईमुळे नागरिकांना भर उन्हात वणवण भटकंती करावी लागत आहे. पालिकेचे टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखला जात नाही. याकडे पालिकेने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
२० लाख लिटरच्या जलकुंभाचे काम अर्धवट...
शहरातील ईदगाह रोडवरील २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम अर्धवट राहिले आहे. या जलकुंभाला नवीन जलवाहिनीची जोडणी न झाल्यामुळे शहरातील निम्म्या नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या जलकुंभाला नवीन जलवाहिनी जोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
महिन्यापूर्वी पॅनल बाेर्ड जळाले...
शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लिंबोटीहून १९ किमीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. १३ किमीच्या जलवाहिनीच्या टेस्टिंगचे काम झाले आहे. ही जलवाहिनी काही ठिकाणी लिकेज आहे. तेथील पॅनल बोर्ड एक महिन्यापासून जळालेले असून, अद्यापही बसविण्यात आले नाही. त्यामुळे ३०० एचपीची एकच मोटार चालू आहे. पॅनल बोर्ड दुरुस्त झाल्यावर ३०० एचपीची दुसरी मोटार सुरू होईल. ज्या ठिकाणी जलवाहिनीला गळती आहे, ती तत्काळ दुरुस्त करून घेणे गरजेचे असल्याचे नगरसेवक अभय मिरकले म्हणाले.
जुन्या जलवाहिनीमुळे समस्या...
लिंबोटी धरणाहून नवीन जलवाहिनीचे काम चालू झाल्यामुळे जुनी जलवाहिनी बंद होती. पुन्हा जुनीच जलवाहिनी सुरू केल्यामुळे जुन्या जलवाहिनीतील पाणी कोलोरीफुलोक्युलेटरमध्ये एकत्र झाले. परिणामी, एका जलकुंभात पाणी सोडण्यात आले होते. ते पाणी तत्काळ बंद करण्यात आले. शहराला शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, असे पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी यांनी सांगितले.