लातूर : गेली सहा दशके लातूर, मराठवाडा तसेच राज्य आणि देशाच्या राजकारणात निष्कलंक, सुसंस्कृत आणि संयत नेतृत्वाची ओळख असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री तथा पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी शुक्रवारी सकाळी लातूर येथील निधन झाले. कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी ते काही दिवसांपूर्वी दिल्लीवरून लातूरला आले होते. त्यांना अचानक अशक्तपणा जाणवू लागल्याने घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील-चाकूरकर, सून अर्चना पाटील-चाकूरकर व नाती ॲड. रुद्राली, ऋषिका असा परिवार आहे.
लातूरचे नगराध्यक्ष ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री
लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल असा त्यांचा दीर्घ, प्रभावी राजकीय प्रवास राहिला.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता लातूरजवळील वरवंटी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी ९:३० वाजता देवघर येथून अंत्ययात्रा निघेल.
शांत, संयमी नेतृत्व
गांधी परिवाराचे निकटवर्तीय राहिलेल्या शिवराज पाटील-चाकूरकर यांचे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. ते उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेचे पदवीधर झाले. त्यानंतर मुंबई येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
सर्वधर्मसमभाव ही त्यांची आचारसंहिता. जातीय राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर राहून त्यांनी नेतृत्व केले. शांत, संयमी आणि विरोधकांनाही आदर देणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
समाजकल्याणासाठी कटिबद्ध असलेले नेते
माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील हे अनुभवी तसेच समाजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले नेते होते. त्यांनी सार्वजनिक जीवनात आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तसेच लोकसभा अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
एक महनीय व्यक्ती हरपली
माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या निधनाने देशाने सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी एक महनीय व्यक्ती गमावली आहे. त्यांनी सार्वजनिक जीवनात अतिशय महत्वाच्या पदांवर काम केले.
- द्रौपदी मुर्मु, राष्ट्रपती
Web Summary : Former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar, a respected leader, passed away in Latur at 91. He served as a minister, governor, and was known for his integrity and commitment to social welfare. His funeral will be held in Varvanti.
Web Summary : पूर्व केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटिल चाकुरकर, एक सम्मानित नेता, का 91 वर्ष की आयु में लातूर में निधन हो गया। उन्होंने मंत्री और राज्यपाल के रूप में कार्य किया, और वे अपनी सत्यनिष्ठा और सामाजिक कल्याण के प्रति प्रतिबद्धता के लिए जाने जाते थे। उनका अंतिम संस्कार वरवंटी में किया जाएगा।