मांजरा प्रकल्पावर पाण्याचा अवैध उपसा; २ मोटारी, १४ स्टार्टर, वायर बंडल अन् हस्ती पाइप जप्त

By हणमंत गायकवाड | Published: March 21, 2024 05:27 PM2024-03-21T17:27:18+5:302024-03-21T17:29:27+5:30

पाणी पिण्यासाठी आरक्षित : प्रकल्पाच्या उजव्या बाजूने बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकांकडून पडताळणी

Illegal extraction of water at Manjara project; 2 cars, 14 starters, wire bundles and hasti pipes seized | मांजरा प्रकल्पावर पाण्याचा अवैध उपसा; २ मोटारी, १४ स्टार्टर, वायर बंडल अन् हस्ती पाइप जप्त

मांजरा प्रकल्पावर पाण्याचा अवैध उपसा; २ मोटारी, १४ स्टार्टर, वायर बंडल अन् हस्ती पाइप जप्त

लातूर : मांजरा प्रकल्पातील पाणीलातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब व अन्य गावांसाठी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पावर पाटबंधारे विभागासह महसूल आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या पथकाचा पहारा आहे. दरम्यान, गुरुवारी बीड जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने मांजरा प्रकल्पाच्या डाव्या बाजूने अचानक पडताळणी केली असता अवैध पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात दोन वीज मोटारी, १४ स्टार्टर, १४ बंडल वायर तसेच हस्ती पाइपचे ५३ नग आदी साहित्याचा समावेश आहे.

बीडचे अप्पर जिल्हाधिकारी कुलकर्णी, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, केजचे तहसीलदार अभिजीत जगताप, मांजरा प्रकल्पाचे शाखाधिकारी सूरज निकम, तलाठी, तहसील कर्मचारी, ग्रामसेवक यांनी मांजरा प्रकल्प डाव्या बाजूने अवैध पाणी उपसा होत असलेल्या ठिकाणी अचानक भेटी देऊन पडताळणी केली. यावेळी २ मोटर, १४ वायर बंडल, १४ स्टार्टर, ५३ नग हस्ती पाइप जप्त करण्यात आले आहेत. मांजरा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीला पाणी घेऊ नये असे निर्देशित केले आहे. तरीपण प्रकल्पाच्यावर असलेले अनेकजण मोटारी लावून पाण्याचा अनधिकृत उपसा करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुरुवारी साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

पाटबंधारे, महसूल आणि महावितरणच्या संयुक्त पथकाचा प्रकल्पावर पहारा....
मांजरा प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये, उपलब्ध पाणी पिण्यासाठीच वापरले जावे, यासाठी पाटबंधारे विभाग तसेच महसूल आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाचा पहारा प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने आहे. तरीपण गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी डाव्या बाजूने पाण्याचा अनधिकृत उपसा होत तर नाही ना, याची पडताळणी केली. यावेळी उपसा करण्यासाठी वापरात येणारे अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लातूर महापालिकेने केली महिन्याला अर्धा दलघमीची पाण्याची बचत...
लातूर महानगरपालिकेच्या वतीने दररोज मांजरा प्रकल्पातून पाणी उचलले जात होते. मात्र संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता लातूरमध्ये पाण्याची उचल कमी केली आहे. तीन दिवस उचल बंद केली आहे. महिन्याला एक दलघमी पाण्याची उचल आहे. यापूर्वी दीड दलघमी पाण्याची उचल केली जात होती. आता एक दलघमी पाणी उचलले जाते. यामुळे महिन्याला अर्धा दलघमीची बचत होत आहे. दरम्यान, लातूर महानगरपालिकेच्या या बचतीचा उपक्रम अन्य संस्थांनी राबवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्पात ६३ दलघमी पाणी...
मांजरा प्रकल्पात ६३ दलघमी पाणी आहे. या पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास पाऊस नाही पडला तरी सप्टेंबर अखेर पाणी पुरेल असे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. मात्र मांजरा प्रकल्पावर मोटारी लावून पाणी उपसा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Illegal extraction of water at Manjara project; 2 cars, 14 starters, wire bundles and hasti pipes seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.