मास्क, फिजिकल डिस्टन्सकडे दुर्लक्ष कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:14+5:302021-03-20T04:18:14+5:30
चाकूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. परंतु, चाकूर नगरपंचायतीच्या वतीने नियमांची काटेकोरपणे ...

मास्क, फिजिकल डिस्टन्सकडे दुर्लक्ष कायम
चाकूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. परंतु, चाकूर नगरपंचायतीच्या वतीने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शहरात विनामास्क फिरणारे, फिजिकल डिस्टन्सकडे दुर्लक्ष करणारे दिसून येत आहेत. कारवाई मात्र नाममात्र होत आहे. दरम्यान, नगरपंचायतीने शहरातील व्यापाऱ्यांना कोविडची चाचणी करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. दरम्यान, बाजारपेठेत अनेकजण विनामास्क बिनधास्त फिरत आहेत. दंडात्मक कारवाईसाठी नगरपंचायतीने पथक नियुक्त केले असले तरी या पथकात स्थानिक कर्मचारी आहेत. त्यामुळे कारवाई करणे कठीण होत आहे. शहर व शहराच्या तीन कि.मी. अंतरापर्यंत रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी आहे. या आदेशाचे पालन बहुतांश व्यापारी करीत आहेत. परंतु, आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत स्थानिक प्रशासन थंड आहे.
शहरात रस्त्यालगत भाजीपाला, फळविक्रेते ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे, त्यांतील बहुतांशजण मास्कचा वापर करीत नाहीत. तसेच फिजिकल डिस्टन्स राखले जात नाही. शहरातील बँकांमध्ये फिजिकल डिस्टन्स राखले जात नाही. त्यामुळे बँकांनी समोर थांबण्यासाठी सावलीची सुविधा निर्माण करणे गरजेचे ठरत आहे. संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःची आणि नोकरांची कोरोना चाचणी करून घ्यावी. अहवाल जर निगेटिव्ह आला असेल तर तो दुकानात ठेवावा. नगरपंचायत, महसूलचे कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तपासणीसाठी आल्यास त्यांना हा अहवाल दाखवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी केले आहे.
चाचणीसाठी सुविधा...
कोविडची चाचणी करण्यासाठी चाकूर ग्रामीण रुग्णालय, चापोली, जानवळ आणि नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा आहे. व्यापारी व कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत कोविडची चाचणी करून घ्यावी.
- डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.
सर्वांनी सहकार्य करावे...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे. व्यापारी, कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांत कोविडची चाचणी करून घ्यावी. त्याचा अहवाल दुकानात ठेवावा. मास्कचा वापर करावा. गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी