हैदराबाद-हडपसर रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST2021-03-18T04:18:55+5:302021-03-18T04:18:55+5:30
कोरोनापूर्व काळात हैदराबाद ते पुणे गाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र नंतर ती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद झाली होती. ...

हैदराबाद-हडपसर रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार
कोरोनापूर्व काळात हैदराबाद ते पुणे गाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र नंतर ती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद झाली होती. त्यानंतर काही गाड्या पूर्ववत झाल्या. मात्र ही गाडी पूर्ववत झाली नाही. या गाडीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा केला.
१ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वे मुंबई तर २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रेल्वे विभाग अधिकारी व उदगीर रेल्वे संघर्ष समितीची संयुक्त बैठक घेऊन विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये हैदराबाद ते पुणे गाडी पूर्ववत करण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने नुकत्याच काढलेल्या एक पत्रकानुसार हैदराबाद ते हडपसर गाडी क्र. ०७०१३/१४ ला मंजुरी देत १ एप्रिलपासून आठवड्यातून तीन दिवस धावणार असल्याचे नमूद केले आहे. या गाडीमुळे हैदराबाद, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूररोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, दौंड व हडपसर ही रेल्वेस्थानके जोडली जाणार आहेत. हैदराबाद येथून रात्री १०.३५ वा. सोमवार, गुरुवार व शनिवारी ही गाडी सुटेल. बिदर येथे रात्री १२ वा., रात्री १.४० वा. उदगीर, ३ वा. लातूररोड, पहाटे ४ वा. लातूर, सकाळी ६ वा. उस्मानाबाद तर हडपसर येथे सकाळी १०.५० मिनिटास पोहचेल. परतीच्या प्रवासात हडपसर येथून मंगळवार, शुक्रवार व रविवारी दुपारी ३.३० वा. सुटेल. लातूर येथे रात्री ८.५३ वा., लातूर रोड येथे ९.३० वा., उदगीर येथे ११.३० वा., तर हैदराबाद येथे पहाटे ३.३५ वा. पोहचेल. या गाडीच्या मंजुरीसाठी राज्यमंत्री संजय बनसोडे, उदगीर रेल्वे संघर्ष समिती, बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, खासदार सुधाकर शृंगारे व उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. सदरील गाडी दैनंदिन होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समिती पाठपुरावा करीत असून प्रवाशांनी या गाडीला उत्तम प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.