हैदराबाद - हडपसर रेल्वेसेवा सुरू होण्यापूर्वीच झाली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST2021-03-24T04:17:46+5:302021-03-24T04:17:46+5:30
कोरोना पूर्वकाळात हैदराबाद ते पुणे रेल्वेगाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र ती नंतर कोविडमुळे बंद झाली होती. सदर ...

हैदराबाद - हडपसर रेल्वेसेवा सुरू होण्यापूर्वीच झाली रद्द
कोरोना पूर्वकाळात हैदराबाद ते पुणे रेल्वेगाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र ती नंतर कोविडमुळे बंद झाली होती. सदर रेल्वे पूर्ववत करण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून पाठपुरावा केला. १ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वे मुंबई तर २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रेल्वे विभाग अधिकारी आणि उदगीर रेल्वे संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक घेत विविध मागण्या मांडल्या. यामध्ये हैदराबाद ते पुणे गाडी पूर्ववत करण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने एका पत्रकानुसार हैदराबाद ते हडपसर गाडी क्रं. ०७०१३/१४ मंजुरी देत १ एप्रिलपासून आठवड्यातून तीन दिवस धावणार असल्याचे नमूद केले होते. या गाडीमुळे हैदराबाद, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, दौंड आणि हडपसर रेल्वे स्थानके जोडली जाणार होती. पुणे जंक्शनवर ६ प्लॅटफॉर्म आहेत. तेथून रेल्वेची फार मोठ्या प्रमाणात ये-जा होते. हैदराबाद पुणे रेल्वे केल्यास सकाळी ११ ते ३.३० पर्यंत ही रेल्वे एकाच प्लॅटफॉर्मवर उभी ठेवणे, रेल्वे परिचलनास अवघड होते. यासाठी सदरची रेल्वेसेवा पुण्यापर्यंत नेण्यास नकार देत हडपसरपर्यंत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, मध्य रेल्वेने सदरची रेल्वे गाडी हडपसरपर्यंत चालविण्यासाठी असमर्थता दर्शविली आहे. त्याबाबत दक्षिण मध्य रेल्वेला कळविण्यात आले असून, रेल्वेगाडी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे.
या समस्येवर उपाय निघू शकतो...
पुणे रेल्वे प्रशासनाने सदरची रेल्वे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे पुणे स्टेशन आणि पुढील शिवाजीनगर, खडकी, चिंचवड, तळेगाव अगदी लोणावळापर्यंत वाढवावी. लोणावळा-पुणे लोकल ट्रेनला पुण्याच्या पुणे-हडपसरपर्यंत वाढवावी जेणे करून हडपसरपासून पुढे उपनगरात आणि पुढील प्रवासासाठी सोयीचे ठरणार आहे. पुणे रेल्वे प्रशासन हटवादी भूमिका घेऊन चक्क या रेल्वेचे परिचालन करण्यास नकार देत गाडी रद्द केली आहे. यामुळे सीमावर्ती भागासह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून मागील काळापासून पुणे इंटरसिटी रेल्वे चालविण्याची मागणी होती. ती या रेल्वेमुळे काही अंशी पूर्ण होणार होती. या रेल्वेचा फायदा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यापारी, जनसामान्यांना पुणे आणि हैदराबादला जाण्यासाठी होणार होता. ही गाडी पूर्ववत होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समिती पाठपुरावा करत असल्याचे सचिव मोतीलाल डोईजोडे म्हणाले.