‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार; दोन्ही डोस घेणारे केवळ ५.२५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:18+5:302021-07-02T04:14:18+5:30
लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार २८५ जणांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला असून, त्याची टक्केवारी ५.२५ ...

‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार; दोन्ही डोस घेणारे केवळ ५.२५ टक्के
लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार २८५ जणांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला असून, त्याची टक्केवारी ५.२५ टक्के आहे. मग डेल्टा प्लसला कसे रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात १८ वर्षांपुढील लाभार्थ्यांची संख्या २० लाख ५६ हजार ८३च्या आसपास आहे. एवढ्या लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत पहिला डोस २६.४५ टक्के नागरिकांनी घेतला आहे तर दोन्ही डोस फक्त ५.२५ टक्के नागरिकांनी घेतला आहे. लसीचा मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे टक्केवारीचे प्रमाण कमी आहे. यामुळे डेल्टा प्लसला कसे रोखणार, असा प्रश्न पडला आहे.
लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम
लसीकरणासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. मात्र, लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे अडचणी आहेत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. परंतु, त्या पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे अनेकदा लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले आहे.
लातूरमध्ये सर्वाधिक लसीकरण
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण लातूर तालुक्यात झाले आहे. पहिला डोस ५९ हजार ९९४ जणांनी घेतला आहे तर दोन्ही डोस १४ हजार ५६७ जणांचा पूर्ण झाला आहे. त्याखालोखाल निलंगा तालुक्यात ४३ हजार ५९८ जणांनी पहिला डोस घेतला असून, ८,६०४ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.