महागाई किती रडविणार; चार महिन्यांत पेट्रोल ६-डिझेल ७, गॅस १२५ ने महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:19+5:302021-02-10T04:19:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे अर्थचक्र मेटाकुटीला आले आहे. आधीच ...

महागाई किती रडविणार; चार महिन्यांत पेट्रोल ६-डिझेल ७, गॅस १२५ ने महागला
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे अर्थचक्र मेटाकुटीला आले आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करीत असलेल्यांच्या खिश्याला या दरवाढीमुळे कात्री लागली आहे.
गेल्या चार महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरात १३ तर घरगुती गॅसच्या दरात १२५ रुपयांची वाढ झाली आहे. १ नोव्हेंबर २०२० रोजी पेट्रोल ८८.८५, डिझेल ७६.८१ तर गॅस ६१९ रुपयांवर होता. १ डिसेंबर २०२० रोजी पेट्रोल ९०.०५, डिझेल ७८.९६ तर गॅस ६६९, १ जानेवारी २०२१ मध्ये पेट्रोल ९४.०४ तर डिझेल ८०.४६ तर गॅस ७१९ रुपयांवर होता. १ फेब्रुवारी २०२१ रोजी पेट्रोल ९४.१४, डिझेल ८३.२९ तर घरगुती गॅसच्या दरात २५ रुपयांनी वाढ होत गॅसच्या किंमती ७४५ रुपयांवर पोहोचल्या आहेत.
पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे, असे सांगितले जात असले तरी या दरवाढीमध्ये सर्वसामान्य भरडले जात आहेत. घरगुती गॅसनेही चार महिन्यांत १२५ रुपयेहून अधिक महागाईचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या महागाईमुळे कुटुंबियांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यातच महागाईची झळ अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. शासनाने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ कमी करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
आर्थिक नियोजन कोलमडले
वाढत्या महागाईमुळे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. कोरोनामुळे काही दिवस काम बंद होते. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा भडका उडाला आहे. वाढलेले दर त्वरित कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
- ऋषिकेश महामुनी, नागरिक
परिस्थिती नियंत्रणात आणावी
गेल्या चार महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलने उच्चांक गाठला आहे. काही दिवसात पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याचे सांगितले जात असले तरी महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
- श्रीनिवास लांडगे, नागरिक
दरवाढ तात्काळ मागे घ्यावी
कोरोनाच्या परिस्थितीतून सावरत असतानाच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा भडका उडाला आहे. कुटुंबाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या दरवाढीचा सर्वसामान्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने सदरील दरवाढ मागे घ्यावी.
- राजश्री मुचाटे, गृहिणी