लातूर जिल्ह्यात आता गृहविलगीकरण बंद; संस्थात्मक विलगीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 16:14 IST2021-06-03T16:13:26+5:302021-06-03T16:14:51+5:30
सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने अडीच ते तीन हजारांच्या आसपास चाचण्या होत आहेत. त्यात वाढ करून तीन ते साडेतीन हजार चाचण्या करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

लातूर जिल्ह्यात आता गृहविलगीकरण बंद; संस्थात्मक विलगीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
लातूर : कोरोनाबाधित रुग्ण संसर्गाचे वाहक ठरू नयेत म्हणून आता सौम्य लक्षणाच्या रुग्णांसाठी असलेली गृहविलगीकरणाची सोय रद्द करण्यात येणार असून, त्यांना संस्थात्मक विलगीकरणात उपचार करण्याचे संकेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. शंभर-दीडशेच्या आत दररोज रुग्ण आढळत आहेत. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेटही ८ टक्क्यांच्या खाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. अशावेळी संसर्ग वाढू नये म्हणून बाधित रुग्णांना गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण जबाबदारीने वागत नाहीत. ते घरात व बाहेर बिनधास्त फिरतात. त्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांना आता संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले जाणार आहे. संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये सर्व सुविधा, जागा उपलब्ध आहेत. संस्थात्मक विलगीकरणात राहिल्यास संसर्ग होणार नाही. प्रसारावर मर्यादा येते. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी गृहविलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन हजारांच्या पुढे चाचण्या
सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने अडीच ते तीन हजारांच्या आसपास चाचण्या होत आहेत. त्यात वाढ करून तीन ते साडेतीन हजार चाचण्या करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्याही चाचण्या करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ती केव्हा येणार निश्चित नसले, तरी लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष असून, लहान मुलांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.