वैज्ञानिकांची जयंती साजरी करण्याचा ठराव
देवणी : तालुक्यातील सर्व शाळांमध्ये वैज्ञानिकांची जयंती साजरी करण्याबाबतचा ठराव पंचायत समितीच्या १८ जूनच्या मासिक सभेमध्ये सर्वांनुमते मंजूर करण्यात आला आहे. सदर बैठक उपसभापती सविता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस शंकरराव पाटील व इतर सदस्य, अधिकारी उपस्थित होते. यापुढे तालुक्यातील सर्व शाळांनी सर्व वैज्ञानिकांची जयंती साजरी करून विद्यार्थ्यांना त्या-त्या वैज्ञानिकांची माहिती द्यावी, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.
मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे ॲड. देशमुख यांना श्रद्धांजली
उदगीर : येथील मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष ॲड. प्रदीप देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, सचिव प्रा. एस. एस. पाटील, प्रा. प्रवीण जाहुरे, दीपक बल्सूरकर, प्रा. माधव खताळ, अरविंद पत्की, वडगावकर, आदींची उपस्थिती होती. मराठवाडा विकासासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांनी आपल्या ज्ञान व कौशल्याचा मराठवाड्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.
इनरव्हील क्लबच्या वतीने योग शिबिर
उदगीर : जागतिक योगदिनानिमित्त इनरव्हील क्लबच्या वतीने पाचदिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात डॉ. संध्या मळगे, डॉ. संगीता सौंदळे, डॉ. सविता पदातुरे, अनुराधा मुक्कावार, श्रेया शिरसीकर यांनी योगा, प्राणायाम, एरोबिक्स व झुंबाचे प्रशिक्षण दिले. डॉ. संध्या मळगे यांनी सकस आहाराचे महत्त्व तसेच योगाचे फायदे याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. डॉ. संगीता सौंदळे यांनी प्राणायामाच्या आधारे सकारात्मकता आणि तंदुरुस्तीचा मंत्र दिला. शिबिरासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीरा चंबुले व सचिव शिल्पा बंडे यांनी पुढाकार घेतला.
कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कोळनूर : जळकोट तालुक्यातील कोळनूर येथे नानजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ठिबकसंच, तुषारसंच, फळबाग, गांडूळखत, नाडेप, शेडनेट, पाॅलिहाऊस, शेततळे, विहीर पुनर्भरण, बांबू लागवड, रेशीम शेती, आदींबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी समूह सहायक शिवाजी येवतीकर, सरपंच संध्या चोले, नागनाथ भरडे, नामदेव चोले, शिवलिंग भरडे, शिवाजी चोले, रवी चोले, शांताबाई भरडे, शंकर हत्ते, उमाकांत शिवशेट्टे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
थेरगाव येथे कोरोना लसीकरण मोहीम
थेरगाव : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील ग्रामसेवक परमेश्वर शिरूरे व उपसरपंच सुनील शिंदे यांनी कोरोना गावात कोरोना लसीकरण माेहीम राबविली. यावेळी १८६ नागरिकांना लस देण्यात आली. याप्रसंगी डॉ. एकुर्गे, पाटील, हरंगुळे, शेख, शिक्षिका काळे, आदींनी परिश्रम घेतले. रेखा जाधव, ज्ञानदेव भांगे, ज्ञानेश्वर वाघमारे, जयश्री तिघिले, उज्ज्वला कांबळे, भारतबाई सोनवणे, सविता सूर्यवंशी, अविनाश शिंदे यांनी लसीकरणाबद्दल जनजागृती केली.