भारनियमनामुळे पिकांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:39+5:302020-12-05T04:32:39+5:30

नागरसोगा : शेती पंपांसाठी महावितरणच्या वतीने भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने ...

Heavy regulation hits crops | भारनियमनामुळे पिकांना बसतोय फटका

भारनियमनामुळे पिकांना बसतोय फटका

नागरसोगा : शेती पंपांसाठी महावितरणच्या वतीने भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने ही पिके वाळत आहेत. २४ तासांपैकी केवळ ८ तासच वीजपुरवठा होत असून तोही रात्रीच्यावेळी असल्याने शेतक-यांना कसरत करावी लागत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात अति पाऊस झाल्याने नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. मुसळधार पावसामुळे यंदा या भागातील पाणी पातळीत वाढ झाली असून विहिरी, तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे या भागात रबीचा पेरा वाढला आहे. सध्या शेतात खरीपातील तुरीचे पीक आहे. विहिरीत पाणी असतानाही शेतक-यांना शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे.

महावितरणच्या वतीने दर महिन्यास भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यात दिवसा कमी व रात्री जास्त दाबाने वीज कृषीपंपाना मिळते. वेळापत्रक व विजेचा प्रवाह हा कागदोपत्रीच ठरत आहे. ग्रामीण भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे सातत्याने कृषीपंप बंद पडत आहेत. तसेच कृषी पंप जळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे काही शेतक-यांनी अलिखित नियम केला असून एका बाजूचे शेतकरी एका दिवशी तर दुस-या बाजूचे शेतकरी दुस-या दिवशी वीजपंप सुरु करतात. त्यामुळे एकदिवसाआडा पिकांना पाणी द्यावे लागत आहे. परिणामी, पिके सुकत आहेत. येथील एक डीपी जळून महिना उलटला. मात्र, त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असतानाही शेतक-यांना पिकांना पाणी देता येत नाही.

शेतक-यांचा जीव धोक्यात...

भारनियमनाचे वेळापत्रक वारंवार बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यासाठी दोघांना शेतात जावे लागत आहे. दरम्यान, अंधारामुळे या परिसरातील दोन शेतक-यांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शेतकरीच टाकतात फ्यूज...

महावितरणकडून पहिल्या आठवड्यात दुपारी ४.५ ते रात्री १२.५, दुस-या आठवड्यात रात्री १२.५ ते सकाळी ८.५, तिस-या आठवड्यात सकाळी ८.५ ते सायंकाळी ४.५ या वेळापत्रकानुसार शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात येतो. दरम्यान, फ्यूज गेला अथवा वीजपुरवठा खंडित झाल्यास ती कामे शेतक-यांनाच करावी लागत आहेत.

Web Title: Heavy regulation hits crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.