यंदाच्या पावसाळ्यात वेळेवर आणि चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दरम्यान, मृग नक्षत्रास प्रारंभ झाल्यापासून तालुक्यात अधूनमधून पाऊस होत आहे. बुधवारी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. ४९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे नाले भरून वाहू लागले आहेत. तसेच बळीराजा सुखावला आहे. आतापर्यंत जळकोट परिसरात १९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घोणसी मंडळात ९६ मिमी पाऊस झाला असल्याने बळीराजाने चाड्यावर मूठ धरली आहे.
गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात चांगला पाऊस होत आहे. यावर्षी मृगात खरीप पेरण्या होत आहेत. दोन- तीनदा मोठा पाऊस झाल्याने साठवण, पाझर तलावात जलसाठा वाढला आहे. त्यामुळे पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. सध्या बाजारपेठेत नामांकित कंपनीचे बियाणे मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. कृषी विभागाने मोफत रासायनिक खते व बी- बियाणे द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.