जळकोट : तालुक्यात चार दिवसांपासून सतत संततधार पाऊस होत आहे. मंगळवारी तालुक्यातील घोणसी महसूल मंडलात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील कोवळ्या पिकांची नासाडी झाली आहे. एकाच दिवशी मंडलात ८८ मिलिमीटर पाऊस झाला तर जळकोटात ४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले आहे.
जळकोट तालुक्यात यंदा वेळेवर पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. दरम्यान, पीक उगवल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे कोवळी पिके पाण्याअभावी करपून जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती. गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या.
मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस सुरु होता. तालुक्यातील घोणसी मंडलात एकाच दिवशी ८८ मिलिमीटर पाऊस झाला. अतिवृष्टी झाल्याने उगवलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जळकोटात ४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे.
जळकोट मंडलात आतापर्यंत ४३० मिलिमीटर तर घोणसी मंडलात २७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील तलावांतील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच नदी-नाले खळखळू लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी घोणसी मंडलातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.