लातुरात अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 19:50 IST2018-09-08T19:49:59+5:302018-09-08T19:50:38+5:30
महापालिकेची कारवाई : तीन ठिकाणची अनधिकृत दुकाने हटविली

लातुरात अतिक्रमणांवर हातोडा
लातूर : वाढलेल्या अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने शनिवारी पहाटे ५ वा़ पासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात छत्रपती शिवाजी चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता, तहसील कार्यालयानजीकच्या अनधिकृत दुकानांवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात हातोडा घातला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य चौक आणि रस्ता खुला झाला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी चौक, परिसर आणि याच चौकातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती. परिणामी, पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. अतिक्रमणधारकांनी ही अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत, अशा वारंवार सूचना महापालिकेने केल्या होत्या. परंतु, अतिक्रमणधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी पहाटे ५ वा़ अचानकपणे महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक शिवाजी चौकात दाखल होऊन अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. सकाळी ९ वा़ पर्यंत या परिसरातील संपूर्ण अतिक्रमणे हटविण्यात आली.
यावेळी महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, उपायुक्त हर्षल जाधव, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, शहर पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव आदींची उपस्थिती होती.
मोहीम सुरुच राहणार
अतिक्रमणधारकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे वारंवार आवाहन करण्यात आले होते. परंतु, ही अतिक्रमणे काढण्यात येत नव्हती. त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात येत असून यापुढे ही मोहीम सुरु राहणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त हर्षल जाधव यांनी सांगितले.