हमीभाव खरेदी केंद्र नावालाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 04:56 PM2019-09-28T16:56:07+5:302019-09-28T16:59:28+5:30

मुग उत्पादकांना प्रति क्विंटलमागे ११०० रुपयांचा फटका

Guarantee rate shopping center is useless in Latur ! | हमीभाव खरेदी केंद्र नावालाच !

हमीभाव खरेदी केंद्र नावालाच !

Next
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत 

- हरी मोकाशे

लातूर : खरीपातील मुग, उडीदाच्या राशी होण्यास सुरुवात झाल्याने शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र, जिल्ह्यात वेळेवर नोंदणीस सुरुवात झाली नसल्याने आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करीत आहेत़ मात्र, मिळणारा दर हा हमीभावाच्या तुलनेत कमी असल्याने मुग उत्पादकांना प्रति क्विंटलमागे ११०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे़

जिल्ह्यात यंदा खरीपाच्या ६ लाख २५ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ५ लाख ४९ हजार हेक्टरवर पेरा झाला़ वेळेवर पाऊस न झाल्याने मुग आणि उडिदाच्या पेऱ्यात घट झाली़ यंदा मुगाचा पेरा केवळ ७० हजार हेक्टरवर, उडिदाचा ७६ हजार हेक्टरवर तर सोयाबीनचा ३ लाख २० हजार हेक्टरवर पेरा झाला़ दरम्यान, पिकांपुरता पाऊस आणि कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगा लगडण्याचे प्रमाण कमी झाले़ 

सध्या जिल्ह्यातील शेतकरी मुग आणि उडीदाच्या राशी करण्यात व्यस्त आहेत़ उतारा घटल्याने आणि आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी राशी केल्यानंतर हा शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत़ दररोज बाजार समितीत मुगाची १ हजार ६८६ क्विंटलच्या जवळपास आवक होत आहे़ आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये असली तरी बाजारात सर्वसाधारण दर ५ हजार ९५० रुपये मिळत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास ११०० रुपयांचा फटका बसत आहे़ उडिदाचीही आवक जवळपास १ हजार ७५० क्विंटलपर्यंत होत आहे़ हमीभाव ५ हजार ७०० रुपये असला तरी बाजारात त्यापेक्षाही काही प्रमाणात कमी दर मिळत आहे़

शेतकरी लूट होऊ नये म्हणून शासनाने नाफेडमार्फत मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र, जिल्ह्यात विलंबाने म्हणजे शुक्रवारपासून आठ ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ त्यामुळे एकाही शेतकऱ्याची नोंदणी झाली नाही़

अद्याप खरेदीचे आदेश नाहीत़़़
हमीभाव खरेदी केंद्रांना केवळ नोंदणीचे आदेश देण्यात आले आहेत़ खरेदी करण्याचे कुठलेही आदेश प्राप्त झाले नाहीत़ आठ ठिकाणी नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले असून एकाही शेतकऱ्याने नोंदणी केली नसल्याचे नाफेडचे प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम़एस़ लटपटे यांनी सांगितले़

एकच दिवसाचा कालावधी शिल्लक़
हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे़ रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने नोंदणी होणार नाही़ त्यामुळे सोमवारचा एकच दिवस नोंदणी करण्यासाठी शिल्लक राहणार आहे़ प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कुठलेही नियोजन नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़ विशेष म्हणजे, जळकोट व देवणी येथे नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले नाही़ त्यामुळे जळकोट येथील शेतकऱ्यांना ४० किमी दूर असलेल्या उदगीरच्या केंद्रावर यावे लागणार आहे़

Web Title: Guarantee rate shopping center is useless in Latur !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.