किरणा दुकानांना आता चार तासांची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:03+5:302021-04-18T04:19:03+5:30
लातूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ प्रतिबंधात्मक ...

किरणा दुकानांना आता चार तासांची मुभा
लातूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध अधिक कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, फळ विक्री, चिकन, मटण विक्री, तसेच बेकरीची दुकाने उघडी ठेवण्यास फक्त चार तासांची मुभा दिली आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने उघडी ठेवता येतील. त्यानंतर उघडी ठेवल्यास कोविड-१९ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी हा आदेश निर्गमित केला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी १९ एप्रिलपासून करण्याचे निर्देश आहेत. लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसाला दीड ते दोन हजारांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आदेशात काही बदल करून किराणा, भाजीपाला, फळ विक्री, चिकन, मटन, बेकरी आदी दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश आहे. केवळ हातगाड्यांवर फिरून फळांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना सायंकाळी ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे. आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.