जीवन विकास प्रतिष्ठानमध्ये अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:51+5:302021-04-16T04:18:51+5:30
जिजामाता विद्यासंकुलात जयंती साजरी लातूर : एमआयडीसी परिसरातील जिजामाता विद्यासंकुलात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ...

जीवन विकास प्रतिष्ठानमध्ये अभिवादन कार्यक्रम
जिजामाता विद्यासंकुलात जयंती साजरी
लातूर : एमआयडीसी परिसरातील जिजामाता विद्यासंकुलात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य सलीमा सय्यद, राजकुमार शिंदे, प्रा. बाबासाहेब सोनवणे आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा
लातूर : वसंतराव काळे खासगी माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या नियमांचे पालन करीत पार पडली. आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपाध्यक्ष युवराज शिंदे, सचिव प्रा. तानाजी भोसले, संचालक दिलीप तेलंग, शिवाजी पाटील, एस. जे. सय्यद, सुधाकर होळंबे, जरिना कुमठे, बाबासाहेब भिसे, राजकुमार जाधव, राजाभाऊ सरडे यांची उपस्थिती होती. या सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा, पालकांचा सत्कार करण्यात आला. यासह पतसंस्थेच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
निर्बंधांमुळे घरच्या घरीच व्यामायाला पसंती
लातूर : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील क्रीडा संकुले, वॉकिंग ट्रॅक, जिम बंद आहेत. परिणामी, नागरिकांनी घराच्या घरीच व्यायामाला पसंती दिली आहे. रोप स्कीटिंग, प्राणायाम, योगासने यासह झुंबा, एरोबिक्सचा आधार घेत नागरिक घरीच व्यायाम करीत आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या वेळी घरातील टेरेसवर वॉकिंग करीत आपला व्यायाम करीत आहेत.
संचारबंदीमुळे गल्लोगल्ली भाजीपाला विक्री
लातूर : कोविडच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनच्या वतीने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परिणामी शहरातील विविध भागांत गल्लोगल्ली भाजीपाला विक्रेते हातगाडे फिरत असल्याचे चित्र आहे. कांदे, बटाटे, फळे, पालेभाज्या गल्लोगल्ली विक्रीला येत आहे. उन्हाची तीव्रता असल्याने सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात हे हातगाडे शहरातील विविध भागांत फिरताना दिसत असल्याचे चित्र आहे.
कल्पनानगर भागात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील कल्पनानगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून नाले सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. यासह या भागातील खुल्या प्लॉटवर कचरा साचला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.
संचारबंदीमुळे घरपोच सेवेला पसंती
लातूर : जिल्हाभरात संचारबंदी पुकारल्यामुळे किराणा मालाला घरपोच पसंती वाढली आहे. ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर देऊन ग्राहक किराणा मालासह स्टेशनरी साहित्यही घरबसल्या मागवीत असल्याचे सध्या चित्र आहे. विविध ॲपच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या किराणा मालाची यादी पाठवून साहित्य मागवत आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शहरातील किराणा विक्रेत्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विद्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन
लातूर : शहरातील मजगेनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात ऑनलाइन पद्धतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य गोविंद शिंदे यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यक्रमात राजकुमार खांडके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. या ऑनलाइन कार्यक्रमास मुख्याध्यापक संजय बिरादार, उपप्राचार्य प्रा. चेवले, अनिल सोमवंशी, अब्दुल गालिब शेख, विनोद सूर्यवंशी आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.