अखिल भारतीय युवा मित्रमंडळतर्फे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST2021-04-17T04:18:27+5:302021-04-17T04:18:27+5:30
शिवभोजन थाळीमुळे गरजूंना आधार लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या वतीने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ...

अखिल भारतीय युवा मित्रमंडळतर्फे अभिवादन
शिवभोजन थाळीमुळे गरजूंना आधार
लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या वतीने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे गरजूंना मोफत शिवभोजन थाळीचा उपक्रम राबविला जात आहे. लातूर शहरातील विविध शिवभोजन केंद्रावर गरजूंना थाळीचे वितरण केले जात आहे. गंजगोलाई, दयानंद गेट परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेणापूर नाका आदी ठिकाणच्या केंद्रावर कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिवभोजन थाळी वाटप केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आधार मिळाला आहे.
गृह विलगीकरणातील रुग्णावर आरोग्य विभागाचा वॉच
लातूर : जिल्ह्यात जवळपास ७० टक्के रुग्ण सौम्य लक्षणाचे आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने गृह विलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. या रुग्णावर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जात असून, पाहणी करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सुंदर हस्ताक्षरासाठी ऑनलाईन वर्ग
लातूर : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. केवळ ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले आहे. विविध शाळांच्या वतीने सुंदर हस्ताक्षरासाठी ऑनलाईन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा घरच्या घरीच सराव करून घ्यावा, असे आवाहन शाळांच्या वतीने करण्यात येत आहे. लिहिण्याची सवय मोडल्याने अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर खराब झाले असल्याचे चित्र आहे. यासाठी शाळांच्या वतीने पुढाकार घेतला जात आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव
लातूर : जिल्ह्यातील १५ गावे आणि ३ वाडी वस्त्यांवर पाणीटंचाई तीव्र झाली आहे. सदरील ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. संबंधित तहसील प्रशासनाच्या वतीने पडताळणी करून या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने ११ कोटी ७० लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्राचार्या सलीमा सय्यद यांचा सत्कार
लातूर : वसंतराव काळे खासगी माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सलीमा सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. विक्रम काळे, युवराज शिंदे, तानाजी भोसले, सुधाकर होळंबे, दिलीप तेलंग, शिवाजी पाटील, विलास पुरी, जरीना कुमठे, मैनोद्दीन शेख आदींसह पतसंस्थेच्या सभासदांची उपस्थिती होती.
व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात जयंती
लातूर : बाभळगाव येथील व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. अंगद कोते, प्रा. सोपान डोपे, बालाजी देशमुख यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. कटारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
लातूर : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील दयानंद गेट परिसर, बार्शी रोड, पाच नंबर चौक, रेणापूर नाका, औसा रोड, राजीव गांधी चौक, गंजगोलाई आदी भागात स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.