खासगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:17+5:302021-04-08T04:20:17+5:30
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे अवाहन लातूर :- जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी खासगी डॉक्टरांनीही पूर्ण क्षमतेने शासनास मदत ...

खासगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे अवाहन
लातूर :- जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी खासगी डॉक्टरांनीही पूर्ण क्षमतेने शासनास मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयास एक दिवस स्वेच्छेने सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी येथे केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना आणि अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बुधवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आणि विलासराव देशमुख विज्ञान संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, आयएमएच्या अध्यक्षा डॉ.काळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी उपस्थित वैद्यकीय संस्थेतील अध्यक्ष व संस्थेतील अधिकाऱ्यांकडून त्यांच्या असोसिएशनची माहिती घेतली. सध्याच्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड आणि औषधांचे नियोजन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु या काळात शासकीय कोविड केअर सेंटर्समध्ये डॉक्टरांची संख्या कमी पडते आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी या सेंटर्समध्ये एक दिवस स्वेच्छेने सेवा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंडिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशनच्या डॉक्टरांनी शासकीय कोविड केअर सेंटर्समध्ये स्वेच्छेने आपली सेवा द्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.