२९० जणांना शेळी- गाई गटाची लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:40+5:302021-03-28T04:18:40+5:30
अनुसूचित जातीतील नागरिकांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांचे जीवनमान उंचावावे म्हणून शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विशेष घटक ...

२९० जणांना शेळी- गाई गटाची लॉटरी
अनुसूचित जातीतील नागरिकांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांचे जीवनमान उंचावावे म्हणून शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याची छाननी करण्यात आली. गाई- म्हशी या दुधाळ गटासाठी जिल्ह्यातून एकूण १ हजार ५११ तर शेळी गटासाठी एकूण २ हजार १२८ प्रस्ताव दाखल झाले होते.
या प्रस्तावांची सोडत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, रोजगार व स्वयंरोजगार, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गाई- म्हशी गटाची १४१ जणांना लॉटरी लागली. तसेच शेळ्या गटासाठी १४९ जणांची निवड झाली आहे.
लाभार्थ्याचा २५ टक्के हिस्सा...
सदरील योजनेसाठी लाभार्थ्याने २५ टक्के स्वत:चा हिस्सा भरणे आवश्यक आहे. ७५ टक्के अनुदान देण्यात येते. त्यासाठी विस्तार अधिकारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, विमा कंपनीचा प्रतिनिधी आणि स्वत: शेतकरी अशी समिती असते. अनुदानाची रक्कम थेट विक्री करणा-याच्या खात्यावर जमा होते. एका दुधाळ गटासाठी ६० हजारापर्यंत अनुदान देण्यात येते, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी सांगितले.
दुधाळ गटाचा सर्वाधिक लाभ लातूरला...
दोन गाई अथवा दोन म्हशींचा एक गट असतो. सर्वाधिक लाभ लातूर तालुक्यास झाला आहे. लातूर तालुक्यातून २१, औसा- २०, निलंगा- २०, उदगीर- १९, अहमदपूर- १५, चाकूर- १४, रेणापूर- ९, देवणी- ८, जळकोट- ७, शिरुर अनंतपाळ तालुक्यातून ८ लाभार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच १० शेळ्या आणि एक बोकड अशा शेळ्यांच्या गटाचा लाभही लातूर तालुक्यास झाला आहे. लातूर- २२, औसा- २१, निलंगा- २१, उदगीर- २०, अहमदपूर- १६, चाकूर- १५, रेणापूर- १०, देवणी- ८, जळकोट- ८ आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातून ८ जणांची निवड झाली आहे.