निलंगा (जि. लातूर) : सोयाबीनला हमीभाव देण्यात यावा तसेच नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना (उध्दव ठाकरे) व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सोमवारी निलंगा येथील बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हमीभाव केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु, पोर्टल बंद झाल्यामुळे खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे जवळपास ३० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीविना रस्त्यावर आहे. सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उध्दव ठाकरे) व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सोमवारी निलंगा येथील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब मिरगाळे, छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, युवा सेनेचे प्रशांत वांजरवाडे, मेघराज पाटील, प्रशांत पेटे, रेखा पुजारी, देवता सगर, रेहाना सय्यद, मेहरान शेख आदींनी आंदोलन केले.
तीन तास आंदोलन...शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तीन तास आंदोलन करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.