सोनपावलांनी आज गौरीचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:19+5:302021-09-13T04:19:19+5:30
आकर्षक, सुबक दागिन्यांच्या खरेदीकरिता महिलांचा उत्साह पाहायला मिळाला. श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर आज गौरींचे आगमन होत आहे. बाजारपेठ गौरी ...

सोनपावलांनी आज गौरीचे आगमन
आकर्षक, सुबक दागिन्यांच्या खरेदीकरिता महिलांचा उत्साह पाहायला मिळाला. श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर आज गौरींचे आगमन होत आहे. बाजारपेठ गौरी - गणपतीच्या सजावटीच्या वस्तूंनी सजली आहे. गौरीच्या मूर्ती, गौरीच्या मुखवट्यासह दागिने, रेडिमेड साड्यांच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे. गौरीचे पितळी, शाडू, माती, पीओपीचे मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. सुबक आकारातील आखीव-रेखीव मुखवटे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. गौरीसाठी लागणारा दागिन्यांचा साज लक्ष वेधून घेणारा आहे. सोनेरी रंगातील दागिने यंदा आकर्षण ठरले आहेत. गौरीच्या सजावटीच्या वस्तूंच्या दरात १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. दागिन्यांमध्ये मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, मोत्याचे सर, चंद्राचे मंगळसूत्र, कमरपट्टा, मुकुट, बाजूबंद, झुमके, जुडापीन, कानातील झुबे, आदी पारंपरिक पद्धतीचे अलंकार बाजारात पाहायला मिळत आहेत. मंगळसूत्रातही विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे दागिने २०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. पाचवारी, नऊवारी या दोन्ही प्रकारांत रेडिमेड साड्या उपलब्ध आहेत. तसेच मोदक, आंब्याचे पान, अष्टविनायक पान, मोत्यांच्या मण्यांच्या बाली, मुकुट, शाल, नेकलेस, शेला, कमळाचे फूल, जास्वंद फूल, मोदकाचे नेकलेस, दुर्वाही विक्रीसाठी आहेत.