गौडगाव ग्रामपंचायतीने घेतला दारूबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:45+5:302021-02-26T04:26:45+5:30
देवणी : तालुक्यातील गौडगाव येथील ग्रामपंचायतीने पहिल्याच बैठकीत गावातील अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पुढाकार घेऊन अवैध दारूविक्री बंदीचा ठराव घेतला ...

गौडगाव ग्रामपंचायतीने घेतला दारूबंदीचा ठराव
देवणी : तालुक्यातील गौडगाव येथील ग्रामपंचायतीने पहिल्याच बैठकीत गावातील अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पुढाकार घेऊन अवैध दारूविक्री बंदीचा ठराव घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गौंडगाव येथील ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली असून सरपंच व सदस्यांची निवड झाली आहे. बुधवारी सरपंच जयश्री शिवाजी बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची पहिलीच बैठक घेण्यात आली. हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असल्याने येथे अवैध दारूविक्री होत आहे. त्यामुळे गावात मद्यपींची संख्या वाढली असून तंट्यांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तळीराम मद्य प्राशन करुन कुटुंबीयांसह गावातील नागरिकांना मानसिक त्रास देत असतात.
गावातील तंट्यांचे प्रमाण कमी व्हावे. तसेच गावचा विकास व्हावा म्हणून, ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला टोकाकाटे यांनी अवैध दारूविक्रीबंदीचा ठराव मांडला. त्यास सोन्याबाई आंबेनगरे यांनी अनुमोदन दिले. त्यावर चर्चा होऊन तो ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे गावातील महिलांतून समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच बैठकीत हा ठराव घेण्यात आला आहे.
एकोपा वाढेल...
अवैध दारूविक्रीमुळे गावात तंटे वाढले आहेत. दारूविक्री बंद झाल्यास तंट्यांचे प्रमाण कमी होऊन गावात एकोपा वाढेल. त्यामुळे गावचा विकास साधण्यास मदत होईल, असे सरपंच जयश्री बिरादार यांनी सांगितले.