साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची गांधीगिरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:12+5:302021-07-18T04:15:12+5:30
पानगाव : उमरगा - खामगाव महामार्गावरील रेणापूर - पानगाव - धर्मापुरी रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे गेट ...

साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची गांधीगिरी !
पानगाव : उमरगा - खामगाव महामार्गावरील रेणापूर - पानगाव - धर्मापुरी रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे गेट दरम्यानच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाची पाणी साचून चिखल निर्माण होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करत युवकांनी या साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक जहाज सोडून गांधीगिरी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
उमरगा - खामगाव महामार्ग क्रमांक ३६१वरील पानगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे गेट दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा असल्याने खड्ड्यात पाणी साचून रस्त्यावर चिखल होत आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. चिखल, खड्ड्यांमुळे दुचाकी घसरत आहेत. परंतु, त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
येथील ग्रामस्थ व विविध पक्ष संघटनांनी वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करत निवेदने दिली, आंदोलने केली. परंतु, दरवर्षीच्या पावसाळ्यात हीच स्थिती राहत आहेत. अखेर येथील युवकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक जहाज सोडून अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
युवकांनी सेल्फी काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावेळी जुनेद आत्तार, ज्ञानेश्वर पांचाळ, विवेक चव्हाण, गणेश गोरे पानगावकर, रजत पांचाळ, नीळकंठेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर बायस, दत्ता गुडदे, ईर्शाद शिकलकर, अभिजित चव्हाण, पुरुषोत्तम पांचाळ, बबलू गडगिळे, माऊली सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.