बोरसुरी साठवण तलावासाठी ५७.८७ कोटींच्या निधीस मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:09+5:302021-04-09T04:20:09+5:30
शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली ...

बोरसुरी साठवण तलावासाठी ५७.८७ कोटींच्या निधीस मंजुरी
शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष पुढाकार घेऊन राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी विशेष निधी मंजूर करून दिला आहे. या माध्यमातून बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथे उभारण्यात येत असलेल्या साठवण तलावाचे उर्वरित बांधकाम व भूसंपादनासाठी ५७.८७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा निधी मंजूर झाला असल्याने आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे आभार मानले. तसेच आ. निलंगेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करुन घेतल्याने बोरसुरी व परिसरातील शेतक-यांसह ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे.
३५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली...
हा साठवण तलाव ९५.१२ हेक्टर जमिनीवर उभारला जात असून त्याची पाणी साठवण क्षमता २.३४७ दलघमी असणार आहे. या माध्यमातून चार गावांतील ४५३ शेतक-यांचे ३५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर बोरसुरी, टाकळी, चिलवंतवाडी, कलमुगळी, चांदोरी व चांदोरीवाडी या परिसरातील विंधन विहिरी व विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यासह बोरसुरी परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. हा निधी प्राप्त झाल्यामुळे सदर साठवण तलाव जून २०२१ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.