कृषी स्वावलंबनसाठी साडेपाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:06+5:302021-08-14T04:24:06+5:30
लातूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी ...

कृषी स्वावलंबनसाठी साडेपाच कोटींचा निधी
लातूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. यंदाच्या वर्षासाठी जिल्ह्याला ५ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर झाला असून, ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत नवीन विहीर खोदकाम, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याला प्लास्टिकचे अस्तरीकरण तसेच वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन संच, तुषार सिंचन संच, परसबाग, पंपसंच, पाईपलाईनसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. त्यासाठी नजिकच्या सामुदायिक सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयातून प्रस्ताव दाखल करावेत. प्रस्ताव सादर करताना ७/१२, ८ अ उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, मोबाईलसह उपस्थित राहून अर्ज करावेत. अर्ज केल्यानंतर शासनाच्या पोर्टलवरुन लॉटरीमध्ये आपली निवड झाल्यानंतर कागदपत्रे मुदतीत अपलोड करावी लागतील, शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, कृषी विकास अधिकारी एस. आर. चोले यांनी केले आहे.
बिरसा मुंडा योजनेसाठी ७२ लाख...
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी यंदा ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही योजनांसाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापर्यंत असावे. किमान ०.४ हेक्टर व कमाल ६ हेक्टर क्षेत्र असावे. जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नवीन विहिरीव्यतिरिक्त इतर बाबींसाठी किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असावे, अशा अटी असल्याचे कृषी विकास अधिकारी एस. आर. चोले यांनी सांगितले.
गेल्यावर्षी ४९७ जणांना लॉटरी...
कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत गेल्यावर्षी ४४६ जणांना लॉटरी लागली. त्यातील १२२ जण अपात्र ठरले तर २१८ जणांची प्रक्रिया सुरु आहे. ३७ कामे पूर्ण झाली आहेत. कृषी क्रांती योजनेंतर्गत ५१ जणांना लाॅटरी लागली. त्यातील ९ जणांची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत, असे कृषी विकास अधिकारी चोले यांनी सांगितले.