इंधन दरवाढीचा शेतीच्या मशागतीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:59+5:302021-04-06T04:18:59+5:30
औसा तालुक्यातील नागरसोगा आणि परिसरातील शेतकरी नांगरणे, मोगडणे, रोटर, पेरणी सरी, उसातील सरी अशी शेतीतील सर्व मशागतीची कामे यंत्राच्या ...

इंधन दरवाढीचा शेतीच्या मशागतीला फटका
औसा तालुक्यातील नागरसोगा आणि परिसरातील शेतकरी नांगरणे, मोगडणे, रोटर, पेरणी सरी, उसातील सरी अशी शेतीतील सर्व मशागतीची कामे यंत्राच्या साह्याने करत आहेत. पारंपरिक शेती कालबाह्य झाली आहे. शेतीसाठी लागणारे बैल आणि पशुधनांची संख्या घटल्याने पारंपरिक शेतीऐवजी शेतकरी यांत्रिकी शेतीवर अवलंबून राहिले आहेत. त्यासाठी डिझेलची आवश्यकता असून, सद्यस्थितीत इंधनाच्या ८७.९४ पैसे प्रति लिटर दर आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचा एकरी मशागतीत वाढ झाली आहे. २०२०-२०२१ नांगरणीचा दर १२०० वरून १८०० रुपये झाला आहे. मोगडणे ६०० वरून १००० रुपये. रोटर १००० वरून १५०० रुपये झाला आहे. सरी ७०० वरून ९०० रुपये दर झाला आहे. पाचटकुट्टी १००० वरून १५०० रुपयांवर गेला आहे. परिणामी, यांत्रिक शेती आता तोट्यात चालली आहे. आपल्याकडील शेती निसर्गावर अवलंबून असल्याने एवढा खर्च करून उत्पादन किती मिळेल, याची नेमकी शाश्वती देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बैलजोडी घेऊन शेती करण्याचा विचार सुरू केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा एकरी दीड ते दोन हजार रुपये मशागतीचा खर्च वाढला आहे. डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
यंत्रावरील मशागत परवडत नाही...
नागरसोगा- डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे ट्रॅक्टर मशागतीच्या दरात वाढ झाली आहे. बँकेच्या कर्जाचे हप्ते, ट्रॅक्टर ड्रायव्हरचा पगार, ट्रॅक्टर आणि इतर साहित्याचा खर्च यामुळे मशागतीच्या दरात वाढ झाली आहे. शेतकऱ्याला ट्रॅक्टरचे दर आता परवडत नाहीत; मात्र शासनाने डिझेलचे भाव वाढविल्याने शेतीच अडचणीत आली आहे. शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या डिझेलमध्ये सवलत द्यावी, यातून ट्रॅक्टर मशागतीला आधार मिळणार आहे. असे हरिश्चंद्र शिंदे म्हणाले.
उत्पन्नापेक्षा लागवडीवर अधिक खर्च...
शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चात वाढ झाल्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात येत आहे. शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या डिझेल, पेट्रोलवर शासनाने नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होत आहे. असे शेतकरी संजय मुरडे म्हणाले. या इंधन दरवाढीमुळे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. शेतीच्या मशागतीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. शेती निसर्गावर अवलंबून असल्याने उत्पन्नाचीही हमी नाही. त्यामध्ये डिझेल, पेट्रोलची वाढ झाल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. असे शेतकरी गजेंद्र जाधव म्हणाले.