चाकूचा धाक दाखवून डाॅक्टरला लुबाडले, तिघांच्या टाेळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:37+5:302021-08-21T04:24:37+5:30
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी व्यंकटेश ब्रिजलाल माहुरे (वय २७, रा. एमआयटी काॅलेज हाॅस्टेल, लातूर) आणि त्यांची मैत्रीण हे १२ ऑगस्ट ...

चाकूचा धाक दाखवून डाॅक्टरला लुबाडले, तिघांच्या टाेळीला अटक
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी व्यंकटेश ब्रिजलाल माहुरे (वय २७, रा. एमआयटी काॅलेज हाॅस्टेल, लातूर) आणि त्यांची मैत्रीण हे १२ ऑगस्ट राेजी रात्री १२.३० माेटारसायकलवरून फिरत-फिरत अंबाजाेगाई रस्त्यावर गेले. दरम्यान, महापूरच्या अलीकडे एका हाॅटेलच्या परिसरात महामार्गालगत हे दाेघे गप्पा मारीत थांबले हाेते. यावेळी माेटारसायकलीवरून अनाेळखी तिघे तिथे दाखल झाले. यावेळी फिर्यादीसह मैत्रिणीला आराेपींनी चाकूचा धाक दाखवत मैत्रिणीच्या गळ्यातील साेन्याची चेन, दाेघांच्या हातातील माेबाइल, घड्याळ असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुबाडला. याबाबत १३ ऑगस्ट राेजी लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुरनं. २०५ / २०२१, कलम ३९२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, याबाबत खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित म्हणून सचिन नंदू चंदाळे (रा. म्हाडा काॅलनी, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, गुन्ह्यात चोरीस गेलेला माेबाइल हाती लागला. अधिक चाैकशी केली असता, विठ्ठल गाेविंद वाघमारे (रा. लेबर काॅलनी, लातूर) आणि महादेव उर्फ भय्या उत्तम सातपुते (रा. लेबर काॅलनी, लातूर) यांना शिताफीने पकडण्यात आले. यावेळी त्यांचीही कसून चाैकशी करण्यात आली. या वेळी तिन्ही आराेपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेले दाेन माेबाइल, साेन्याची चेन, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, माेटारसायकल असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांनाही लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती पाेलीस निरीक्षक गणेश कदम यांनी दिली.