पोलीस वसाहतीत जनावरांचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:03+5:302021-03-06T04:19:03+5:30
उदगीर : जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा मात्र धोक्यात आहे. पोलीस वसाहतीत उंदीर, घुशींसह ...

पोलीस वसाहतीत जनावरांचा मुक्त संचार
उदगीर : जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा मात्र धोक्यात आहे. पोलीस वसाहतीत उंदीर, घुशींसह मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. मोकाट जनावरांसह डुकरांचा वावर वाढला आहे तसेच पावसाळ्यात घरांना गळती लागत असल्याने पोलीस कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त घरे आहेत. त्यापैकी केवळ ५० घरांमध्ये पोलीस कर्मचारी कुटुंबासह राहतात. रात्री-अपरात्री बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जीव मात्र मुठीत धरून रहावे लागत आहे. शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहेत. पोलीस वसाहतीला लागूनच मार्केट यार्ड असल्यामुळे सतत गोंगाट, धुळीचे लोट या वसाहतीमध्ये येत असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या वसाहतींमधील अनेक घरे जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांना गळती लागली असून वसाहतीमध्ये झाडे-झुडपे वाढलेली आहेत. नगरपालिका या वसाहतीकडे स्वच्छतेबाबत दुर्लक्ष करत आहेत. साफसफाईही वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी वसाहतीऐवजी भाड्याने राहत आहेत.
मंजुरीनंतर नवीन वसाहतीचे बांधकाम...
शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून कागदोपत्री पूर्तता होणे शिल्लक राहिले आहे. शासनस्तरावरून मंजुरी येताच नवीन वसाहतीचे बांधकाम सुरू होईल, असे उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी सांगितले.
ठिकठिकाणी कच-याचे ढीग...
पोलीस वसाहतीत पालिकेकडून नियमितपणे स्वच्छता केली जात नाही. परिणामी, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे जनावरांचा वावर वाढला आहे. दुर्गंधी पसरत असल्याने पोलीस वसाहतीतील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेची सातत्याने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भाड्याने राहण्यावर भर...
पोलीस वसाहतीतील निम्म्या इमारतीत पोलीस कुटुंबीय राहत नाही. वसाहतीत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात गळती लागते. त्यामुळे बहुतांश कर्मचारी भाड्याने राहणे पसंत करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वसाहतीस अवकळा येत असल्याचे पाहावयास मिळत आहे.